भाईंदर :- काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील पेनकर पाडा परिसरात एक खासगी शिकवणी घेणार्या शिक्षकावर अल्पवयीन मुलाने चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील गुजराती चाळ, पेणकरपाडा येथे राजू ठाकूर हा ठाकूर अकॅडमी नावाने बारावीपर्यंत शिकवणी वर्ग घेतो. याच शिकवणी वर्गात गेल्या वर्षी हा अल्पवयीन मुलगा शिकला आहे. अरीहंत किराणा दुकानाच्या समोर पेनकरपाडा येथे राजू ठाकुर याचे अल्पवयीन मुलाबरोबर भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून त्या मुलाने गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास राजू याच्या पोटावर चाकुने वार केले. त्यानंतर राजू याला तेथील नागरिकांनी मीरारोड मधील भक्तीवेदंत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोटामध्ये मोठी जखम झाली आहे व आतडे फाटलेले आहेत. त्यामुळे पोटाचे ऑपरेशन करावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुलगा स्वतः पोलीस ठाण्यात दाखल
राजू याच्या पोटात चाकू घुसवून पोटास गंभीर स्वरूपाच्या दुखापत झाल्यामुळे अल्पवयीन मुलाविरोधात काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो अल्पवयीन मुलगा स्वतः पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून हा हल्ला कशामुळे झाला याचा अधिक तपास काशीमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कावरे हे करत आहेत. तर गुन्हा करणारा आरोपी हा त्यांच्या आई -वडिलांच्या ताब्यात असून त्यांच्याकडे तपास अधिकारी हे तपास करत आहेत.