वसईः वसई- विरार शहरात प्रदुषण टाळण्यासाठी आणि उत्सव मंगलमय बनवण्यासाठी महापालिकेने यंदा इको गणेशा, वसुंधरेच्या संवर्धनासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी महापालिकेने विविध जनजागृतीपर उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. २५ लाख लोकसंख्या असलेल्या वसई- विरार शहरात हजारो कुटुंबे आणि शेकडो गणेश मंडळे दीड ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश उत्सव साजरा करतात. गणेश मूर्त्या, सजावट यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होत असते. ते टाळण्यासाठी महापालिकेने इको गणेश, वसुंधरेच्या संवर्धनासाठी ही संकल्पना हाती घेतली आहे. प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीऐवजी शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्त्यांचा स्विकार करावा. पर्यावरणस्नेही सजावट, मूर्ती दान, विजेची बचत आदी बाबी कराव्यात यासाठी महापालिका जनजागृती करणार आहे. नागरिकांना पर्यावरणाचे महत्व, सध्या होत असलेल्या निसर्गाच्या हानीबाबत जागृती करून, उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक कसा करता येईल याकडे वळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या जनजागृतीसाठी समाजमाध्यमांचा देखील वापर केला जाणार आहे, अशी माहिती आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली.
शहरातील एकूण १४९ तलावांपैकी प्रमुख २० तलावांमध्ये दरवर्षी गणपती विसर्जन केले जाते. या नैसर्गिक जलाशयांमधील प्रदूषण रोखण्यासाठी, गतवर्षी तलावांशेजारी आणि विसर्जन मार्गावर तब्बल ८३ कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. तर ३१ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारली होती. दहा दिवसांमध्ये ३१ हजार ९४८ गणपती मुर्त्यांचे विसर्जन झाले. त्यापैकी २० हजार ८३ गणपतींचे विसर्जन हे कृत्रिम तलावांमध्ये झाले होते. एकूण विसर्जनाच्या ६३ टक्के विसर्जन हे कृत्रिम तलावात झाले होते. दीड आणि पाच दिवसांच्या गणपती विसर्जनापैकी ७० टक्के विसर्जन हे कृत्रिम तलावात झाले.
गौरी गणपतीला ५४ टक्के तर अनंत चतुर्दशीला ६० टक्के विसर्जन हे कृत्रिम तलावात झाले होते. एकूण विसर्जनाच्या ६३ टक्के विसर्जन हे कृत्रिम तलावात झाले होते. मागील वर्षी केलेला पहिलाच प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आणि नागरिकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद यामुळे यंदादेखील कृत्रिम तलाव, मूर्ती संकलन केंद्र आणि निर्माल्यापासून खतनिर्मिती हे प्रयोग राबवले जाणार असून त्यादृष्टीने जनजागृती केली जाणार आहे, असेही आयुक्त पवार यांनी सांगितले. शाडू मातीच्या गणेश मूर्ती आणि पर्यावरणपुरक देखावे उभारून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.