बस- ट्रक अपघातात आठ विद्यार्थी जखमी

वाडा मनोर मार्गावरील सापने गावच्या हद्दीत उभ्या असलेल्या बसला ट्रकने मागtन जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात आठ विद्यार्थी प्रवासी जखमी झाले आहेत.

वाडा : वाडा मनोर मार्गावरील सापने गावच्या हद्दीत उभ्या असलेल्या बसला ट्रकने मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात आठ विद्यार्थी प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना साडे सातच्या सुमारास घडली.
रोहित वाघात( वय 17)मनस्वी पाटील (16)सानिका पाटील( 17)अस्मिता सुरूम ( 18) ममता गोंड (18)भुमिका वावरे ( 18) निकिता धानवा ( 17) दिपाली वाघात( 17)असे आठ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर वाडा ग्रामीण रूग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, वाडा आगाराची वाडा- बास्ते ही बस सकाळी साडे सहा वाजता सुटून ती बास्ते या गावातून प्रवासी घेऊन परतत होती.या बसमध्ये बहुसंख्य विद्यार्थी होते. सदरची बस सापने थांब्यावर प्रवाशांना गाडीमध्ये घेत असताना थांबली असता मागून येणा-या ट्रक क्रमांक एक्स 8618 या ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर वाडा ग्रामीण रूग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती आगारप्रमुख मधुकर धांगडा यांनी दिली. अपघात प्रकरणी ट्रकचा चालक धमेंद्र यादव याला वाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या दहा दिवसांच्या काळावधीतील बसचा हा दुसरा अपघात असल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.