वसईः एका तरुणाची हत्या करून फरार झालेल्या मुख्य आरोपीला मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने तब्बल आठ वर्षांनी उत्तरप्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील मजरा चिल्लीमल गावातून अटक केली.शिवाभैय्या असे आरोपीचे नाव आहे.शिवाभैय्या याचे संपूर्ण नाव किंवा इतर कोणतीही माहिती पोलिसांकडे उपलब्ध नव्हती. तरीही गुन्हे शाखा दोनच्या पथकाने फिर्यादी, आरोपी, साक्षीदार तसेच खबर्यांची मदत घेऊन मुख्य आरोपी शिवाभैय्याचा माग काढण्यास सुरुवात केली होती. शिवाभैय्याच्या हातावर एक टॅट्यू होता. त्या टॅट्यूने पोलिसांना शिवाभैय्यापर्यंत पोचवले. पथकाने त्याला उत्तरप्रदेशातील चित्रकुट जिल्ह्यातील मजरा चिल्लीमल येथून अटक केली. तपासात त्याचे नाव शिवबाबू उर्फ शिवाभैय्या जगतपाल निषाद (२०) असल्याचे निष्पन्न झाले आहे. हत्या केली तेव्हा शिवाभैय्याचे वय बारा वर्षाचे होते.
१८ मार्च २०१६ रोजी रात्री शिवाभैय्या, रवी श्यामवीर डांगुर, अभिजित मिश्रा उर्फ कडा उर्फ सचिन आणि कृष्णा कमलेश दुबे यांनी सुभाषचंद उर्फ भालू रामसागर गुप्ता (२१) याची भांडणाचा राग मनात धरून नायलॉनच्या रस्सीने गळा आवळून हत्या केली होती. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी रवी डांगुर, अभिजित मिश्रा आणि कृष्णा दुबे यांना अटक केली होती. तर मुख्य आरोपी शिवाभैय्या फरार झाला होता. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांतकुमार ठाकूर, अमोल कोरे यांनी केली.