पोशेरा गणाची निवडणूक; ५ जूनला मतदान

मोखाडा पंचायत समितीच्या पोशेरा गणाची जागा रिक्त झाल्यानंतर याची पोटनिवडणूक कधी लागणार याबाबत अनेकांना उत्सुकता होती.

मोखाडा पंचायत समितीच्या पोशेरा गणाची जागा रिक्त झाल्यानंतर याची पोटनिवडणूक कधी लागणार याबाबत अनेकांना उत्सुकता होती. यातच आता या निवडणुका जाहीर झाल्या असून या गणासाठीच्या निवडणुकीसाठी येत्या ५ जूनला मतदान होणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा तालुक्यातील सर्व पक्षियांची हालचाल सुरू झाली आहे. संबंधित जागेवर याआधी शिवसेनेच्या सारिका निकम विजयी झाल्या होत्या. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर रद्द झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकीत निकम या जिल्हा परिषदेवर निवडून गेल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. यानंतर आता या जागेवर निवडणूक होत आहे.
मागील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका स्वबळावर झाल्यानंतर मोखाडा पंचायत समितीच्या ६ जागांपैकी शिवसेने ५ जागा जिंकत निर्विवाद विजय प्राप्त केला होता. या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी होवून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये मिळून सत्ता स्थापन होवून पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीला उपसभापतीपद मिळाले आहे. यामुळे सत्ता बदल किंवा काही राजकीय मोठी उलथापालथ करण्याच्या उद्देशाने ही निवडणूक तशी महत्वाची नसली तरी हातत भोपळा असणारी भाजप मात्र खाते खोलण्याच्या उद्देशाने ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याची शक्यता आहे. त्यातच राज्यात महाविकास आघाडी असली तरी नुकत्याच झालेल्या नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी-सेना आमनेसामने लढल्यामुळे या गणाच्या निवडणुकीतही स्वबळावर लढणार की आघाडीत ही जागा पुन्हा कॉंग्रेसच्या वाट्याला जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या तरी सर्वच पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.
या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र १७ ते २३ मे २०२२ या कालावधीत दाखल करता येतील. २२ मे २०२२ रोजी रविवारच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशन पत्रांची छाननी २४ मे २०२२ रोजी होईल. ५ जून २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी ६ जून २०२२ रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल, असा हा कार्यक्रम असणार आहे.