सफाळे: सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळांकडून गैरवर्तन न होता उत्सवाचे पावित्र्य राखले जावे यासाठी गणेश मंडळांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलिसांकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पोलिसांनी विविध क्षेत्रांतील व्यक्तींना समाविष्ट करून मंडळांचे मूल्यमापन करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली केली. या समितीने सफाळे पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन मूल्यमापन करण्यास सुरुवात केली आहे.
सफाळे पोलीस स्टेशन हद्दीतील सफाळे, विराथन खुर्द, रामबाग, झांझरोळी, केळवा रोड, सोनावे (घरतपाडा), तांदुळवाडी, गिराळे, नावझे या गावांतील धर्मदाय आयुक्त विभागाकडून रजिस्टर केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना समितीकडून भेट दिली जात आहे. यावेळी मंडळाने धर्मदाय आयुक्त आणि ग्रामपंचायतीकडून आवश्यक परवाना घेतला आहे का?, मंडळाने स्टेज व प्रकाश योजनेसाठी अधिकृत मीटरद्वारे वीज घेतली आहे का? पोलीस ठाण्याकडून गणेशोत्सवासाठी परवानगी व ध्वनिक्षेपक परवाना घेतला आहे का? मंडळामुळे वाहतुकीस व रहदारीस अडथळा निर्माण होत नाही ना? तसेच मंडळाने आयोजित केलेला देखावा, आरास, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम याचा विषय दर्जा व कार्यक्रमातील शिस्त, पोलिसांनी घातलेल्या अटीचे नियमांचे पालन केले का? महिला व मुलीसाठी स्वतंत्र्य रांगेची व्यवस्था केली आहे का? तसेच प्रदूषण, स्वच्छता, व पर्यावरण जागरुकता, पोलीस सहकार्य आदी बाबी तपासण्यात करण्यात येत आहेत.
समितीकडून केलेल्या मूल्यमापनातून लवकरच सफाळे पोलीस ठाण्याच्या वतीने प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मंडळांना एक कार्यक्रम आयोजित करून उत्कृष्ट गणराया पुरस्कार २०२३ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. सफाळे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे , पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पाटील, पत्रकार नवीन पाटील, शिक्षक जगदीश किणी, वृक्षमित्र प्रकाश काळे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र ठाकूर आणि पोलीस पाटील (तांदुळवाडी) सुजीत पाटील यांच्याकडून पाच, सात आणि 11 दिवसांच्या सार्वजनिक गणेश मंडळांचे मूल्यमापन केले जात आहे. या उपक्रमाला विविध गावातील गणेश मंडळे चांगला प्रतिसाद देत असल्याने मूल्यमापन समितीने समाधान व्यक्त केले. तसेच या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त मंडळांनी नोंदणी केल्यास भविष्यात याची व्याप्ती वाढून गणेशोत्सवाचे रुपडे बदलेल, असा आशावाद मूल्यमापन समितीने याप्रसंगी व्यक्त केला.