वसईः वसई -विरार महापालिकेची मुदत संपून अडीच वर्षांचा कालावधी झाला आहे. असे असताना वसई -विरार शहरातील बहुतांश माजी नगरसेवक अधिकार नसताना महापालिकेच्या लेटरहेड तसेच व्हिजिडींग कार्डचा वापर करत आहेत. तसेच त्यांच्या वाहनांवर नगरसेवक लिहून महापालिकेच्या लोगोचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे संवैधानिक पदाचा गैरवापर करणार्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे तसनीफ शेख यांनी केली आहे.वसई-विरार महापालिकेतील नगरसेवकांची मुदत २८ जून २०२० ला संपलेली आहे. त्या वेळेपासून महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्तांची नेमणूक झालेली आहे. महापालिकेच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. नगरसेवक पद हे संवैधानिक व कायदे नियमांनुसार लोकसेवक पद असल्याने त्याचा गैरवापर करता येत नाही. मात्र, स्वतःचा दरारा-रुबाब दाखवण्यासाठी अनेक माजी नगरसेवक आजही स्वतःला नगरसेवक व सभापती म्हणवून घेताना दिसत आहेत.
अधिकार नसताना अनेक जण महापालिकेच्या व्हिजिटींग कार्डसह लेटरहेडचाही वापर करत असल्याचे आढळून आलेले आहे. या लेटरहेड आणि व्हिजिंटींग कार्डावर महापालिकेचा लोगो, पत्ता, दूरध्वनी क्रमांक टाकलेला असतो. वाहनांवर नगरसेवक व महापालिका लोगो लावून शहरभर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा आदेश न मानणार्या व संवैधानिक पदाचा गैरवापर करणार्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी तसनीफ शेख यांनी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे केली आहे.