घरपालघरआरटीई प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची परीक्षा कायम

आरटीई प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची परीक्षा कायम

Subscribe

मात्र जवळपास दोन महिने उलटून देखील प्रशासनाची कोणतीही हालचाल दिसत नसल्याने यंदा मोफत शिक्षण मिळेल, अशी आशा मावळत असल्याची खंत पालकांनी बोलताना सांगितली.

जव्हार: बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत २५ टक्के जागा आर्थिक मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राखीव ठेवल्या जातात. विद्यार्थ्यांना सन २०१२ पासून सुरू झालेल्या आरटीई शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रति वर्ष २५ विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळून जव्हार शहर तथा ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्याने लाभदायक ठरत आहे. साधारणतः डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू होत असलेल्या या प्रक्रियेला सुरुवात होत असते. मात्र, या वर्षी फेब्रुवारीचा पहिला आठवडा संपत आला तरी सन २०२४ – २५ या शैक्षणिक सत्राकरिता अद्याप पावेतो आरटीई शिक्षण प्रणाली बाबत कोणतीही अधिसूचना प्राप्त झाली नसल्याने नेमका केव्हा या प्रक्रियेला मुहूर्त मिळेल या संभ्रमात पालक आहेत. आर्थिक दुर्बल आणि सामाजिक वंचित घटकातील पालक गेल्या दोन महिन्यांपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची वाट पाहत आहेत. मात्र जवळपास दोन महिने उलटून देखील प्रशासनाची कोणतीही हालचाल दिसत नसल्याने यंदा मोफत शिक्षण मिळेल, अशी आशा मावळत असल्याची खंत पालकांनी बोलताना सांगितली.

**आर टी ई योजनेची रक्कम प्रलंबित **
आरटीई २५ टक्के या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती केंद्र सरकार ४० टक्के आणि राज्य सरकार ६० टक्के मिळून संबंधित शाळेला प्रतिपूर्तींची रक्कम अदा करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारने ही प्रतिपूर्ती रक्कम मोठ्या प्रमाणात थकवली आहे. राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांची दोन हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम शासनाने थकवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या हिताची ही योजना शासन बंद करण्याची शंका प्रवेश प्रक्रिया विलंबामुळे निर्माण झाली आहे.

- Advertisement -

डिसेंबर महिन्यापासून आर टी ई प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत आहोत.मात्र दोन महिने अधिकचे होऊनही शासन तथा प्रशासन स्तरावरून कोणतीही हालचाल होत नाही.जव्हार तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील गरीब व गरजूंना ही योजना फलदायी असून शिक्षणाची एक चांगली संधीतून विद्यार्थी आपला विकास घडवू शकतील, त्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया लवकर राबविण्याची आवश्यकता आहे.
गौरी भोये, पालक, काळीधोंड

आमच्या कार्यालयाला अजूनपर्यंत आर टी ई प्रवेश प्रक्रियेची कोणतीही सूचना आली नाही. आल्यावर त्वरित ही प्रक्रिया इंटरनेटवर उपलब्ध होऊ शकेल.
पुंडलिक चौधरी, गट शिक्षण अधिकारी,जव्हार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -