घरपालघरविरारमध्ये डायलेसिस विभागाचे विस्तारीकरण

विरारमध्ये डायलेसिस विभागाचे विस्तारीकरण

Subscribe

त्यांच्यासाठी रात्रपाळीत ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस संचालक मंडळाचा आहे.या संस्थेच्या माध्यमातून आज पर्यंत ७५,००० डायलेसिस करून असंख्य रुग्णांना माफक दरात सेवा पुरविण्यात आली आहे.

वसई: किडनी निकामी झालेल्या रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेवून, श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्टने विनामूल्य भाडे तत्वावर दिलेल्या दत्तमंदिर विरार (प) च्या इमारतीत ट्रस्टने १ एप्रिल २०१२ रोजी सुरु केलेल्या डायलिसीस विभागात,नव्याने १५ मशीन समाविष्ट होत असून, एकूण २३ डायलेसिस मशीन उपलब्ध होणार आहेत. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या या डायलिसिस विस्तारीकरण केलेल्या विभागाचे उद्घाटन दिवाळीचे निमित्त साधून शुक्रवारी १० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०.४५ वाजता आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, वसई विरार महानगरपालिकेचे पहिले महापौर राजीव पाटील, आमदार राजेश पाटील, विरारमधील नामवंत डॉक्टर मंडळी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या मशीन आल्यानंतर दररोज किमान ७५ रुग्णांना डायलेसिस करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. येणार्‍या रुग्णांपैकी नियमित नोकरी करणारे रुग्ण सुध्दा येत असतात. अशा रुग्णांना डायलेसिस करण्यासाठी उपजीविकेचे साधन असलेल्या नोकरीच्या ठिकाणी त्या दिवशी जाता येत नाही. त्यांच्यासाठी रात्रपाळीत ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस संचालक मंडळाचा आहे.या संस्थेच्या माध्यमातून आज पर्यंत ७५,००० डायलेसिस करून असंख्य रुग्णांना माफक दरात सेवा पुरविण्यात आली आहे.

येथे डायलेसिस करण्यासाठी येणार्‍या रुग्णांकडून फक्त रु. ४००/- अशी नाममात्र फी घेवून ही सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. या रुग्णांपैकी वसई -विरार महानगरपालिकेच्या हद्दीत रहाणार्‍यांना प्रती डायलेसिस रु. ३५०/- वसई- विरार महानगरपालिका आर्थिक सहाय्य नियमितपणे करीत असल्याने, रुग्णांना फक्त रु. ५०/- मध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली जाते. ही सेवा उपलब्ध करुन देताना, रुग्णाला डायलेसिस, डायलेझर, टयूबिंग, आय. व्ही सेट, इंजेक्शन, डॉक्टर फी, व नास्ता सुध्दा संस्था पुरवित आहे. नेफ्रोलॉजिस्ट डॉ. चैत्यन्न सावंत, डॉ. पवन पाठक यांचे देखरेखी खाली रुग्णांना या सेवेचा लाभ प्राप्त होत आहे.ही माफक दरात सेवा पुरविण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांचे सहकार्य संस्थेस लाभत आहे. विशेषतः श्री जीवदानी मंदिर ट्रस्ट, श्री ॐ साईधाम मंदिर ट्रस्ट, विरार, कै. यशवंत स्मृती चॅरीटेबल ट्रस्ट, ताराबेन तलाक्षी धारोड आणि कुटुंबीय, शौकीन जैन, सुरेश दुग्गड, डिवाईन स्कुल नालासोपारा, उत्सव हॉटेल, विरार, बालाजी ट्रस्ट, श्री मंगलमुर्ती ट्रस्ट, स्वयंभू महादेव मंदिर ट्रस्ट बोळींज, शनी मंदिर ट्रस्ट वाघोली, हाय टेक सर्जिकल सिस्टीमस, मुंबई आणि विवा चॅरीटेबल ट्रस्ट यांच्याकडून नियमित आर्थिक सहाय्य लाभत आहे.या विभागाचे संचालन संजीवनी हॉस्पिटल, विरार, करीत असून, निदान डायग्नोसीस सेंटर, प्रकृती हॉस्पिटल, बोळींज, सिद्धेई हॉस्पिटल विरार, साई संजीवनी कार्डीयाक सेंटर, विरार आणि सुशीला हॉस्पिटल, विरार, डॉ. विनय राव, डॉ. सुरेश सोनावणे, डॉ. शैलेश बारोट, डॉ. ए. एस. भवर हे सुध्दा वैद्यकीय सेवा पुरवीत आहेत. या विभागात डायलेसिस घेण्यार्‍या गरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना मंजूर करून घेण्याचे प्रयत्न संस्था करीत आहे. पुढील वर्षात, आणखी १७ मशीनची व्यवस्था करून दिली जाणार असून, एकूण ४० मशीन कार्यरत असणार आहेत व त्यामुळे दररोज किमान १२० रुग्ण याचा फायदा घेवू शकतील. या असंख्य रुग्णांना जीवनदान देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदतरूप व्हावे, असे संस्थेचे अध्यक्ष अजीव पाटील यांनी आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -