वायु शुद्धीकरण यंत्रांच्या प्रयोगाची हवा निघाली

त्यासाठी विरार पूर्व आर. जे. चौक, तुळींज पोलीस चौकी, वसई-अंबाडी चौक, संतोष भुवन नाका, नारंगी चौक, रेंज ऑफिस नाका, गोलानी नाका, वसई रेल्वे स्थानक (पूर्व), वसई पेल्हार फाटा, वसई पापडी मार्केट, विरार जुना जकात नाका आणि विरार पूर्व रेल्वे स्थानक अशी १२ ठिकाणे पालिकेने निश्चित केली होती. पहिल्या टप्प्यात यातील सहा ठिकाणी ही यंत्रे बसवण्यात आलेली आहेत.

वसईः वसई-विरार शहरात बसवण्यात आलेल्या ‘वायु शुद्धीकरण यंत्रांचा प्रभाव त्या जागेपुरताच मर्यादित असल्याने त्याऐवजी वृक्ष लागवडीसारख्या अन्य उपाययोजना कराव्यात, असे निर्देश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वसई-विरार महापालिकेला दिल्याने दुसर्‍या टप्प्यातील सहा यंत्र बसवण्याच्या निर्णयाला महापालिकेने स्थगिती दिली असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हवा शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत वसई-विरार महापालिकेला १६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. या निधीतून महापालिकेच्या वाहन, उद्यान व बांधकाम विभागाच्या माध्यमातून वेगवेगळी कामे हाती घेण्यात आलेली आहेत. त्यात बांधकाम विभागाच्या माध्यमातून शहरात १२ ठिकाणी ‘वायु शुद्धीकरण यंत्र बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सहा व मार्च २०२२ नंतर उर्वरित सहा वायु यंत्रणा बसवण्याची कार्यवाही करण्यात येणार होती. त्यासाठी विरार पूर्व आर. जे. चौक, तुळींज पोलीस चौकी, वसई-अंबाडी चौक, संतोष भुवन नाका, नारंगी चौक, रेंज ऑफिस नाका, गोलानी नाका, वसई रेल्वे स्थानक (पूर्व), वसई पेल्हार फाटा, वसई पापडी मार्केट, विरार जुना जकात नाका आणि विरार पूर्व रेल्वे स्थानक अशी १२ ठिकाणे पालिकेने निश्चित केली होती. पहिल्या टप्प्यात यातील सहा ठिकाणी ही यंत्रे बसवण्यात आलेली आहेत.

कर्नाटकस्थित मे. टेक्ट्रॉन कंपनीने ही यंत्रे बसवली असून एक वर्षाची देखभाल-दुरुस्तीही ते करणार आहेत. या एका यंत्राकरिता महापालिकेला ३ लाख ५६ हजार इतका खर्च आलेला आहे. या शुद्धीकरण यंत्रात तीन फिल्टर आहेत. पहिल्या स्तरात गाड्यांच्या वर्दळीमुळे उडणारे धुळीचे कण हवेतून विलग होतात. दुसर्‍या टप्प्यात एम-१० पार्टीकल्स, तर तिसर्‍या टप्प्यात ऑईल म्हणजेच एम-२.५ पार्टिकल्सचे विलग होऊन शुद्ध हवा वातावरणात सोडली जाईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आलेले होते. या कंपनीने या आधी बंगळूरु महापालिका क्षेत्र, बंगळूरु, दिल्ली मेट्रो स्टेशन, यशवंतपूर, बंगलूरकंटा व क्रिष्णानागार्जुनपूरम या रेल्वे स्थानकांत अशाप्रकारची यंत्रे बसवली आहेत. विशेष म्हणजे हे यंत्र २४ तास कार्यरत असणार असून, याकरता केवळ पाचशे वॉट इतकी वीज लागणार आहे. महापालिका ही वीज स्वत:च्या सिग्नल यंत्रणा असलेल्या डीपीतून घेणार असल्याची माहिती पालिकेकडून त्यावेळी देण्यात आलेली होती. विशेष म्हणजे या सहा यंत्रांचे २१ लाख ३६ हजार रुपयांचे बिल पालिकेने मे. टेक्ट्रॉन कंपनीला अदा केलेले आहे.

 

प्रदूषण नियंत्रणासाठी स्प्रिंकलर्सचा विचार

मर्यादीत जागेतच प्रभावी ’वायू शुद्धीकरण यंत्राचा प्रभाव कमी भागात होत असल्याने पुढील टप्प्यातील यंत्रे न बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी या निधीतून ’ट्रॅक माउंटेड स्प्रिंकल्स सिस्टीम’ बसवणार आहोत. परदेशात काही ठिकाणी या यंत्राचा वापर केला जातो. वसई-विरारमध्ये ही यंत्रे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होणार आहे.