आदिवासी विकास महामंडळामध्ये भातखरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ

यामुळे व्यापार्‍यांच्या बोगस भात विक्रीवर फार मोठे नियंत्रण येणार आहे. शेतकर्‍यांच्या सातबारावर व्यापारी मोठ्या प्रमाणात भात विक्री करत आहेत, अशी ओरड नेहमीच होत होती.

डहाणू : आदिवासी विकास महामंडळ कार्यालय कासा यांच्यावतीने तालुक्यात शेतकर्‍यांसाठी आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत धान्याची विक्री प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात पालघर, वसई, डहाणू, तलासरी तालुक्यातील शेतकर्‍यांची नोंदणी सुरू आहे.येथील कार्यालयात यंदा भात खरेदीच्या नोंदणीकरिता लाईव्ह व्हिडिओ आवश्यक असणार आहे. कार्यालयीन स्तरावरून शेतकर्‍यांना भाताची विक्री प्रक्रिया ऑनलाईन असल्याने वेळेत करण्याचे आवाहन कासा आदिवासी विकास महामंडळ कार्यालयातून करण्यात आले आहे.यावर्षीपासून पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू झाल्याने, शेतकर्‍यांना प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागणार आहे. ३ ते ४ सेकंदाचा व्हिडिओ काढून तो ऑनलाइन नोंदणी केली जात आहे. शेतकर्‍याचा अर्जासोबत कागदपत्रे अपलोड केल्यानंतरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे व्यापार्‍यांच्या बोगस भात विक्रीवर फार मोठे नियंत्रण येणार आहे. शेतकर्‍यांच्या सातबारावर व्यापारी मोठ्या प्रमाणात भात विक्री करत आहेत, अशी ओरड नेहमीच होत होती.

लाईव्ह व्हिडिओ अपलोड न केल्यास नोंदणीची प्रक्रियाच पूर्ण होणार नाही. सोबत शेतकर्‍याला प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागणार आहे, त्यावेळीसुद्धा त्याचा व्हिडिओ काढला जाणार आहे. शेतकर्‍याचा लाईव्ह व्हिडिओ आधारभूत खरेदी केंद्रावर नोंदणीच्या वेळी अपलोड करावा लागणार आहे. त्यासाठी शेतकर्‍याला प्रत्यक्ष आपल्या सातबारासह उपस्थित राहावे लागत आहे. भात खरेदीसाठीची मुदत २१ऑक्टोबर होती. अजून पर्यंत खूप कमी शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे पुन्हा १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. डहाणू, तलासरी, पालघर, वसई येथून सद्या १५०० पर्यंत शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे. यासाठी शेतकर्‍यांनी लवकर म्हणजे १० नोहेंबरपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन कासा व मनोरचे उप. प्रादेशिक व्यवस्थापक नितीन भुरे यांनी केले आहे.