कृषीभूषण पुरस्कारावर शेतकरी नाराज

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषीभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.

तालुक्यातील गालतरे येथील गोवर्धन इको व्हिलेजचे प्रमुख सनतकुमार प्रभुजी यांना यंदाचा राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार नाशिक येथे झालेल्या एका समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते व राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. मात्र या पुरस्कारावर अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून निषेध नोंदवला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषीभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यावर्षीचा कृषीभूषण पुरस्कार वाडा तालुक्यातील गालतरे येथील गोवर्धन इको व्हिलेजचे प्रमुख सनतकुमार प्रभुजी यांना देण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्याला हा पुरस्कार द्यायवा हवा होता. कृषीमंत्र्यांनी शेतीवर संशोधन करणाऱ्या शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्याला पुरस्कार द्यायला हवा होता. मात्र एखाद्या संस्थेला हा पुरस्कार दिल्याने तो आम्हाला मान्य नसून आम्ही त्याचा निषेध करतो.
– बी. बी. ठाकरे, ओबीसी नेते

कृषीभूषण या पुरस्काराचा खरा मानकरी सर्वसामान्य शेतकरीच असायला हवा. धर्मदाय संस्थेला कृषीभूषण पुरस्कार देणे संयुक्तिक वाटत नाही. तुटपुंज्या साधनांसह व कमी गुंतवणुकीत शेतीमध्ये काबाडकष्ट करून वेगवेगळे प्रयोग करणारा शेतकरीच खरा कृषीभूषण असू शकतो, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटू लागल्या आहेत. नुकतेच राजेंद्र पवार यांनी कृषीरत्न पंजाबराव देशमुख पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते स्विकारण्यास नकार दिला होता. त्यातच आता दुसरा महत्वाचा पुरस्कार एका संस्थेला दिल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या एखाद्या प्रगतशील शेतकऱ्याला हा पुरस्कार द्यावयास पाहिजे होता. असा पुरस्कार दिल्याने त्याला काही अर्थ राहिला नाही.
– प्रफुल्ल पाटील, युवा शेतकरी

हेही वाचा –

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मर्सडीज बेबी, फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार