घरपालघरकृषी विभागाच्या टाळेबंदीने शेतकरी त्रस्त; मंडळ कृषी अधिकारी, सहाय्यक झाले दिसेनासे

कृषी विभागाच्या टाळेबंदीने शेतकरी त्रस्त; मंडळ कृषी अधिकारी, सहाय्यक झाले दिसेनासे

Subscribe

खोडाळा विभागातील असंख्य महसुली गावे आणि चौपट गावपाड्यांनी व्याप्त असलेल्या विशाल कार्यक्षेत्रातील खोडाळा मंडळ कृषी कार्यालयाच्या विस्कळीत कामकाजामुळे आदिवासी शेतकरी हवालदिल झाला आहे.

खोडाळा विभागातील असंख्य महसुली गावे आणि चौपट गावपाड्यांनी व्याप्त असलेल्या विशाल कार्यक्षेत्रातील खोडाळा मंडळ कृषी कार्यालयाच्या विस्कळीत कामकाजामुळे आदिवासी शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र निर्ढावलेले प्रशासन त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. मोखाडा तालुक्यातील खोडाळा मंडळ कृषी कार्यालय हे महत्त्वाचे कार्यालय असून याठिकाणी शेती संबंधीत कामांसाठी शेतकर्‍यांचा मोठा राबता असतो. परंतु कर्मचार्‍यांअभावी शेतकर्‍यांना येथे कायमच टाळेबंदीशी सामना करावा लागत आहे. मार्च अखेरपर्यंत नरेगाची कामे, बांधबंधीस्तीची कामे, मंडळ कृषी अधिकारी, पर्यवेक्षक व सहाय्यक यांच्या सलग अनुपस्थिती बाबत आणि इतरही कामाबाबत कृषी विभागाच्या नावाने शंख होता.

आता शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मार्गदर्शन व इतर शेतीसंबंधीत कामांची गरज आहे. खोडाळा मंडळ कृषी कार्यालयात हेलपाटे मारुनही कोणीच भेटत नाही. त्यामुळे आम्ही शेतकरी कृषी मंत्री दादा भुसे यांना पत्रव्यवहार करणार आणि चौकशी लावणार आहे.
– ईश्वर गांगुर्डे, शेतकरी, आडोशी

- Advertisement -

तत्कालीन परिस्थितीत शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर ओरड झाली होती. त्यामुळे अगदी काहीच दिवस अधिकारी व कर्मचारी या कार्यालयाकडे फिरकले आहेत. मात्र वातावरण शांत झाल्यानंतर पुन्हा अधिकार्‍यांनी पाठ फिरवली आहे.
शेती हंगामात फळबाग लागवड, प्रात्यक्षिके ही कामे प्राधान्याने करायची आहेत. तथापी अधिकारी व कर्मचारीच जागेवर उपलब्ध नसल्याने मागणीचे अर्ज द्यायचे तरी कुणाकडे आणि वैविध्य पूर्ण प्रात्यक्षिके व एसआरटी पद्धतीची भात लागवड पहायची ती कुणाकडून, असा प्रश्न या भागातील शेतकर्‍याकडून विचारला जात आहे.

वारंवार मागणी करूनही कार्यालयात कुणीही नसते. या कर्मचार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी.
– प्रदीप वाघ, पंचायत समिती सदस्य, मोखाडा

- Advertisement -

आदिवासी शेतर्‍यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि अद्ययावत तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवून विकसनशील शेतकरी घडवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तथापी अधिकारीच झारीतल्या शुक्राचार्यांप्रमाणे तळागाळातील शेतकर्‍यांपर्यंत विकासाची गंगा पोहोचू देत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी होवूनही पहिले पाढे पंचावन्न आहेत. त्यावर वरिष्ठ प्रशासनाचा काहीच अंकुश नसल्याने एकूणच कर्मचार्‍याचे फावले आहे. त्यामुळे आत्ता थेट कृषी मंत्री दादाजी भुसे यांचेकडे दाद मागण्याची तयारी येथील शेतकरी करत आहेत. याबाबत मंडळ कृषी अधिकारी खोडाळा कार्यालयाशी संपर्क साधला असता मिटींग असल्याने सर्व कर्मचारी तालुका येथे असल्याचे सांगून मंडळ कृषी अधिकारी यांनी कर्मचार्‍यांची बाजू सावरून घेतली आहे.

हेही वाचा – 

‘या’ जिल्ह्यात बियरच्या विक्रीत वाढ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -