वेळेआधी येणाऱ्या पावसामुळे शेतकरी धास्तावला

सध्या सर्वत्र वातावरणात बदल होत आहेत. त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रवादळामुळे राज्यात वेळेआधीच पाऊस धडकणार, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

सध्या सर्वत्र वातावरणात बदल होत आहेत. त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रवादळामुळे राज्यात वेळेआधीच पाऊस धडकणार, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. मे महिन्याच्या अखेरीस सर्वत्र शेतीच्या कामांना वेग आला असून अशातच पाऊस पडला, तर शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागेल. या चिंतेने शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. तर आर्थिक नियोजनही बिघडण्याची भीती त्यांना आहे. सध्या शेतीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्यात शेतकरी कामामध्ये व्यग्र झाला आहे. मजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकरी कुटुंबांनी काडीकचरा वेचून बांधावरील झाडेझुडपे साफ करणे आदी कामे सुरू केली आहेत. सद्य:स्थितीत शेतकऱ्यांकडे बैलजोडी नसल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने कामे उरकून घेण्यात येत आहेत. बांधबंदिस्त तसेच राब करणे आदी कामे अपूर्ण राहिली आहेत. ती पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार असून जांभूळ, आंबे या फळांचे पीकही उशिराने बाजारात दाखल होत आहेत. अशातच पाऊस सुरू झाला तर नुकसानीला सामोरे जावे लागणार असून आर्थिक नियोजन बिघडेल, अशी चिंता शेतकऱ्यांना आहे.

 

त्याचप्रमाणे कृषी निविष्ठा दुकानदारांकडे खरेदीसाठी लोकांनी आपल्या आर्थिक नियोजनाची व्यवस्था सुरू केली आहे. बँकेचे पीक कर्ज किंवा खासगी सावकाराकडून पैसे घेऊन आपल्या शेतीच्या बियाणे मजुरी यासाठी आर्थिक नियोजन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या गुरांच्या सहाय्याने मिळालेले शेणखत भरून ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहाय्याने शेतात टाकून हे मिश्रण करण्याच्या कामांनाही वेग आला आहे.

 

साधारण जून महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात शेतकरी राब करणे, मशागत करणे, बांधबंदिस्ती, लाकूड फाटा, आगोटची पूर्वतयारी करतो. मात्र यावेळी वेधशाळेने १९ मे रोजी पावसाचा अंदाज दिला आहे. त्याचा धसका घेत शेतकरी, वीटभट्टी उत्पादकही मे महिन्यातच कामे करताना दिसत आहेत. बैलांच्या किमतीतही वाढ झाल्याने शेतकऱ्यांना ते परवडणारे नसल्याने शेतातील नांगरणी ट्रॅक्टरच्या सहाय्यानेच सुरू केली आहे. वेळे अगोदरच पाऊल बरसला तर आंबा पिकाचे खूप मोठे नुकसान होईल. आंबा पीक पूर्ण तयार होण्यास व तो विक्री करण्यास अजूनही १५ दिवसाचा कालावधी हवा आहे. नाहीतर आंबा पीक खराब होऊन शेवटी फेकून द्यावे लागणार असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा –

मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणानेच निवडणुका होणार, SCचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात काय होणार?