पालघरः सध्या पालघर जिल्हयात केंद्र सरकारच्या अनेक प्रकल्पांची कामे सुरु आहे. अनेक बड्या कंपन्यांनी कामे घेतली आहेत. कामासाठी मालवाहतूक करताना सुरक्षेची कोणतीच काळजी घेतली जात नसल्याने अपघात होऊन वाहनचालक आणि पादचार्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. मालवाहतूक करण्यासाठी आरटीओकडे नोंदणीकृत मालवाहतूक करणारी वाहने वापरणे आवश्यक असते. पण, कमी पैशात मालवाहतूकीचा परवाना नसलेलीच वाहने वापरली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारचा महसूलही बुडत असल्याची तक्रार काही नोंदणीकृत मालवाहतूकदार संघटनांनी आरटीओकडे केली आहे. पण, त्यावर कोणतीच कारवाई केली जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान, मालवाहतुकीसह आता शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी जिल्हयात सर्वच ठिकाणी खाजगी जीप, कार, बसेसचा वापर केला जात असल्याचे दिसत आहे.
त्यासाठी आरटीओची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची कोणतीच काळजी न घेता क्षमतेपेक्षा अधिक मुले अक्षरशः कोंबून नेली जातात. याप्रकरणीही आरटीओकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप केला जातो. जिल्हाधिकारी, खासदार, आमदार, यांनी रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत याबाबत उपप्रादेशिक अधिकार्यांना वेळोवेळी सूचा दिल्या जात असताना त्यांच्याकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने खासगी वाहतूकदारांचा मनमानीपणा वाढला आहे.
०००
अनधिकृत वाहतूक करणार्या गाड्यांवर नेहमी कारवाई करत असतो. पण, काही नियम हे परिवहन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने आम्ही कारवाई करू शकत नाहीत.
–आसिफ बेग, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, पालघर पोलीस.