भाईंदर :- मीरा-भाईंदर महापालिका पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी गणेशोत्सवासाठी दरवर्षी कृत्रिम तलावांची निर्मिती करते. या तलांवामध्ये गणेश मूर्त्यांचे विसर्जन केल्यामुळे पर्यावरणाची हानी कमी होते. परंतु यावर्षी गेल्यावर्षीपेक्षा कृत्रिम तलावांची संख्या कमी करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ४ कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. त्याची संख्या कमी करून यावर्षी दोनच तलाव उभारण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. यानुसार यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करताना अधिकार्यांनी नवीन कृत्रिम तलावांना ब्रेक लावला आहे.
महापालिकेकडून दरवर्षीच्या गणेशोत्सवात गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिकेकडून विविध ठिकाणी असलेले तलाव, नद्या, खाडी, समुद्र किनार्यांवर व्यवस्था केली जाते. यावर्षी देखील २४ ठिकाणी महापालिकेने गणेश विसर्जनाची व्यवस्था केली आहे. पीओपीच्या गणेश मुर्त्या पाण्यात विरघळत नाहीत तसेच त्या मुर्त्यांवरील केमिकलयुक्त रंग पाण्यात विरघळून जलप्रदूषण होते. या जलप्रदूषणामुळे जलचरांवर परिणाम होतो. हे जलप्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने महापालिकेने २०२१ व २०२२ मध्ये भाईंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, मीरारोड येथील जॉगर्स पार्क, शिवार गार्डन व भाईंदर पूर्वेकडील शंकर नारायण महाविद्यालय या चार ठिकाणी चार कृत्रिम तलाव निर्माण केले होते.
या तलावांमध्ये सुरुवातीला गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी गणेशभक्तांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. त्यानंतर याची जनजागृती करण्यात आली. या तलावांमध्ये विसर्जन करणार्या गणेश भक्तांचा महापालिकेकडून सत्कार करण्यात आला. त्यामुळे अनेक गणेश भक्तांची कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्याची मानसिकता तयार झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण पूरक गणेश विसर्जनासाठी नवीन कृत्रिम तलाव साकारण्यास ब्रेक लावून गतवर्षी साकारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची संख्या निम्म्यावर आणली आहे. यावर्षी मीरारोड येथील शिवार गार्डन व जॉगर्स पार्क येथेच कृत्रिम तलाव साकारण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.