पंधरा लाख लुटणारे दरोडेखोर अटकेत

मुंबई-अहमदाबाद हायवेवर चिंचोटी गावच्या हद्दीतील सातीवली खिंडीत हवालाची १५ लाख रुपयांची रोकड घेऊन पसार झालेल्या सहा दरोडेखोरांना राजस्थानमधील वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली आहे.

arrest

मुंबई-अहमदाबाद हायवेवर चिंचोटी गावच्या हद्दीतील सातीवली खिंडीत हवालाची १५ लाख रुपयांची रोकड घेऊन पसार झालेल्या सहा दरोडेखोरांना राजस्थानमधील वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली आहे. चिंचोटी गावाच्या सातीवली खिंडीत हवालाचे लाखो रुपये घेऊन जाणाऱ्या दोघांवर सहा ते सात दरोडेखोरांनी कोयत्याने वार करून दरोडा टाकला होता. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने चार जणांना राजस्थान तर, दोघांना मुंबईतून अटक केली आहे. दरोड्यातील संपूर्ण रोकड आणि वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. पुढील तपास व चौकशीसाठी सहाही जणांना वालीव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पेल्हारच्या दालमील कंपाऊंड येथे राहणारे पुरणसिंग राजपूत (वय ३१) आणि कारचालक प्रेमसिंग हे मालक रायसिंग राजपूत यांचे हवालाचे १४ लाख ९० हजार रुपये घेऊन ३ जानेवारीला मुंबईहून नालासोपाऱ्याला येण्यासाठी निघाले होते. त्यांची कार बंद पडल्याने टोईंग करून येत होते. रात्री नऊच्या सुमारास दरोडेखोरांनी दोघांवर हत्याराने वार करून मारहाण केली होती. त्यानंतर दरोडेखोरांनी पैशांची बॅग आणि दोघांचे दोन्ही मोबाईल, असा एकूण १५ लाखांच्या मालाची चोरी करून पळून गेले होते. पूरणसिंग यांनी वालीव पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिल्यावर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. सातीवली खिंड ते दहिसर चेक नाका इथपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज आणि माहितीदाराने माहिती दिल्यावर राजस्थानमधील वेगवेगळ्या गावातून चौघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यावर मुंबई येथून दोघांना अटक केली.

सोहनसिंग ओमसिंग खडवाड (वय २८, रा. मजेरा, ता. कुभळगड, जि. राजसमंद, राजस्थान), शंकरसिंग जालनसिंग खरवाड (वय २७, रा. मजेरा, ता. कुभळगड, जि. राजसमंद, राजस्थान), करणसिंग भैरवसिंग राजपूत (वय २४, रा. बडगुला, ता. कुभळगड, जि. राजसमंद, राजस्थान), रावरसिंग उदयसिंग दसाना (वय ३१, रा. जीवदानी चाळ, विरार पूर्व), चेतन मनोहर घायतडखे (वय २८, रा. मिलन चाल कमिटी, वडाळा, मुंबई) आणि जाहिद निसार अहमद शेख (वय २७, रा. सुलेमान कंपाऊंड, अँटीप हिल, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.

हेही वाचा –

Covid Self Test Kit : आता विक्रेत्यांना कोविड सेल्फ टेस्टिंग किटबाबत पालिकेला माहिती द्यावी