बोईसरमधील कंपनीत दोन गटात हाणामारी; २७ जणांना अटक

स्टील उत्पादनात नामवंत समजल्या जाणाऱ्या विराज ग्रुपच्या तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल या कारखान्यात शनिवारी संध्याकाळी दोन गटात हाणामारी झाली.

स्टील उत्पादनात नामवंत समजल्या जाणाऱ्या विराज ग्रुपच्या तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल या कारखान्यात शनिवारी संध्याकाळी झालेल्या हाणामारीत बोईसर पोलीस ठाण्यातील सुमारे १७ पोलीस कर्मचारी आणि दोन पोलीस अधिकारी असे १९ पोलीस तर काही कामगारही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बोईसरमधील टिमा आणि तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून जवळपास २७ पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. विराज ग्रुपच्या तारापूर येथील विविध प्लांटमध्ये सुमारे १० हजार कामगार काम करत असून १६ एप्रिलपासून मुंबई लेबर युनियनने बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे कारखान्यातील वातावरण काही दिवसांपासून गंभीर असल्याचे समजते. शनिवारी अचानक उफाळलेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

यामध्ये कारखान्यातील मालमत्तेचे व कारखान्याबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान करण्यात झाले. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात काही कामगारही जखमी झाल्याचे युनियनकडून सांगण्यात आले. युनियनयचे सभासद असलेले कायमस्वरूपी कामगार, १०० हून अधिक खासगी कामगार व कंपनीचे जवळपास १५० बाऊंसर यांच्यात हा संघर्ष झाला. मुंबई लेबर युनियन व कंपनी व्यवस्थापनाने स्थापन केलेली युनियन यात मुंबई लेबर युनियनचे सदस्य असलेल्या हजारो कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने स्थापन  केलेल्या युनियनचे सदस्य होण्यासाठी दबाव आणला जात होता. यातून अनेक वेळा संघर्षही झाला. परंतु दुपारी कंपनी व्यवस्थापनाने मुंबई लेबर युनियनच्या कामगारांना जबरदस्तीने कंपनीच्या बाहेर काढून काही गावगुंडांच्या मदतीने कंत्राटी कामगारांची नेमणूक केली. यामुळे संतप्त कामगार व जावळपास १५० बाऊंसर, १०० हून अधिक आणलेले कामगार यांच्यात तुफान हाणामारी व दगडफेक झाली. यात जवळपास ७० ते ८० कामगार जखमी झाले असून त्यात तीन कामगारांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून याप्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा – 

तुम्ही नैतिकता पाळणार नसाल तर कोथळा काढण्याचा अधिकार,संजय राऊतांचा भाजपला इशारा