सत्पाळा उपसरपंच, सदस्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल

विरार पश्चिमेकडील राजोडी गावातील एका जागेतील ६ लाखांचे सामान चोरी केल्याप्रकरणी सत्पाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यासह १२ जणांविरोधात अर्नाळा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

विरार पश्चिमेकडील राजोडी गावातील एका जागेतील ६ लाखांचे सामान चोरी केल्याप्रकरणी सत्पाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यासह १२ जणांविरोधात अर्नाळा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई जिल्हा न्यायालयाने नऊ जणांचे जामीन फेटाळल्याने उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यावर अटकेची शक्यता वर्तवण्यात येते. राजोडी येथील एका जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला आहे. तक्रारदार वेणुगोपाल जोशी यांनी राजोडी वटार येथील जागा राधाबाई कांबळे आणि इतरांकडून २०१७ रोजी विकत घेतलेली आहे.
वसईच्या भूमीअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून जागेभोवती सिमेंटचे पत्रे आणि पत्र्याचे शेड बांधले होते. १४ नोव्हेंबर २१ रोजी सकाळच्या सुमारास जागेत घुसून पत्रे, सिमेंटचे पोलसह ६ लाख रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची तक्रार जोशी यांनी दिल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजवरून अर्नाळा पोलीस ठाण्यात सत्पाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच उमेश पाटील, त्यांची पत्नी ग्रामपंचायत सदस्या कविता पाटील, मारीओ डिसोजा, विल्सन डिसोजा, रज्जू डिसोजा, लाली डिसोजा, सारु डिसोजा, ग्रेटा डिसोजा, वेन्सी डिसोजा, सरिना डिसोजा, स्टफीना डिसोजा, समीर यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरोधात उपसरपंच उमेश पाटील, त्यांची पत्नी ग्रामपंचायत सदस्या कविता पाटील, मारीओ डिसोजा, विल्सन डिसोजा, रज्जू डिसोजा, लाली डिसोजा, सारु डिसोजा, ग्रेटा डिसोजा, वेन्सी डिसोजा यांनी वसईच्या जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, न्यायाधिश सुधीर देशपांडे यांनी या नऊही जणांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, जामीन अर्ज फेटाळले गेल्याने आरोपींना मुंबई हायकोर्टात दाद मागावी लागणार आहे. तोपर्यंत त्यांच्याविरोधात अटकेची टांगती तलवार आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळल्यानंतरही पोलीस अटक करत नसल्याने आरोपी फिरत असल्याची तक्रार जोशी यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. राजकीय दबावापोटी पोलीस आरोपींना अटक करत नसल्याचीही त्यांची तक्रार आहे.