माजी आमदार नरेंद्र मेहतांविरुद्ध गुन्हा दाखल

भाजपच्याच एका नगरसेविकेने मेहतांविरोधात लैंगिक शोषणासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्यानंतर मेहतांनी राजकीय संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते, पण आगामी मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून गेल्या वर्षीपासून मेहता पुन्हा राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत.

BJP MLA Narendra Mehata

सतत वादाच्या भोवर्‍यात असलेले भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवघऱ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियम १९८८चे कलम १३ (१) (इ), १३(२) सह भादंवि संहिता कलम १०९ नुसार गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात त्यांची पत्नी सुमन मेहता यांना सहआरोपी करण्यात आले आहे.

नरेंद्र मेहता यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून अपसंपदा जमवल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत १० मे २०१६ साली लोकायुक्त यांच्या आदेशान्वये खुली चौकशी लावण्यात आलेली होती. तब्बल 6 वर्षानंतर १९ मे रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी आमदार नरेंद्र मेहता १ जानेवारी २००६ ते ३१ ऑगस्ट २०१५ या कालावधीत मीरा-भाईंदर महापालिकेचे नगरसेवक तसेच मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. या काळात लोकसेवकपदाचा आणि अधिकाराचा दुरुपयोग करून त्यांनी उत्पन्नापेक्षा ८ कोटी २५ लाख ५१ हजार ७७३ रुपये एवढी अधिक मालमत्ता संपादित केल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर ठेवला आहे. तसेच त्यांची पत्नी सुमन मेहता यांनी लोकसेवक नरेंद्र मेहता यांनी गैरमार्गाने संपादित केलेल्या मालमत्तेचा विनियोग करण्यास साहाय्य केल्याचाही ठपका ठेवला आहे.

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून नरेंद्र मेहता आणि सुमन मेहता यांच्या विरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मेहता यांचे घर आणि कार्यालयाची झडती घेण्याचे काम सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, भाजपच्याच एका नगरसेविकेने मेहतांविरोधात लैंगिक शोषणासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्यानंतर मेहतांनी राजकीय संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते, पण आगामी मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून गेल्या वर्षीपासून मेहता पुन्हा राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत. त्यासाठी पक्षाची दोरी आपल्या हाती घेण्यासाठी मेहतांची धडपड सुरू आहे. गेल्याच आठवड्यात आमदार रवींद्र चव्हाण यांनी भाईंदरमध्ये भाजपच्या कार्यक्रमात मेहतांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुका लढवल्या जातील, असे सूतोवाच केले होते, पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने मेहतांना धक्का बसला आहे.

म्हणून चौकशीला ब्रेक
मेहता व त्यांच्या कंपन्या शहरातील सर्वात जास्त टिडीआर घेणार्‍या यात मोठ्या प्रमाणात घोटाळा, शासन महसूल बुडवणे तसेच उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती व बेनामी संपत्तीप्रकरणी झालेल्या तक्रारीची दखल घेत लोकायुक्तांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. ही चौकशी पालघर जिल्हा एसीबी करीत होती. माजी मुख्यमंत्री व आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील गृह विभाग असल्याने तसेच मेहतांचे फडणवीस यांच्याशी असलेले जवळचे संबंध असल्याने चौकशीला ब्रेक लागला होता.

केबल चालक असणार्‍या मेहतांनी नगरसेवक त्यानंतर आमदार झाल्यापासून स्वत:ची, कुटुंबिय, कंपन्यांच्या संपत्ती मालमत्तेत प्रचंड वाढ झाली असल्याची तक्रार करण्यात आली होती. सेव्हन इलेव्हन हॉटेल्स, सेव्हन इलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनी, सेव्हन इलेव्हन कम्युनिकेशन, सेव्हन इलेव्हन कॉर्पोरेशन आदी कंपन्या असून त्यात मेहता व कुटुंब मोठे भागधारक आहेत. त्यांनी पत्नी सुमन मेहता यांना साडेचार कोटींची विदेशी लॅम्बोर्गिनी गाडी भेट दिली होती. त्या गाडीचा अपघात झाला तेंव्हा टिकेची झोड उठली होती. नगरसेवकपदावर असताना मेहता यांना डिसेंबर २००२ मध्ये अनधिकृत बांधकामास संरक्षण देण्यासाठी २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती.