घरपालघरअखेर म्हात्रेवाडीत फिरला बुलडोझर

अखेर म्हात्रेवाडीत फिरला बुलडोझर

Subscribe

भूमाफियांनी तिवरांची झाडे तोडून त्याठिकाणी मातीचा भराव करून मोठ्या प्रमाणावर बेकायदा चाळी बांधल्या आहेत. आता तर हजारो कुटुंबे याठिकाणी राहवयास आली आहेत.

वसईः सरकारी, मीठागर आणि काही खासगी जमिनीवर कांदळवनाची कत्तल करून उभारण्यात आलेल्या जुचंद्र येथील म्हात्रेवाडीतील अनधिकृत चाळींवर अखेर वसई- विरार महापालिकेचा बुलडोझर फिरला. वसई -विरार महापालिकेच्या पथकाने १९ घरे आणि २७ गाळ्यांवर कारवाई करून ते जमिनदोस्त केले. याठिकाणी हजारो गाळे आणि घरे असून त्यांच्यावर कारवाई होते का याकडे आता लक्ष लागले आहे. नायगाव पूर्वेकडील जुचंद्र गावातील सरकारी, मीठागर आणि थोडीफार खासगी जमिनीवर बेकायदा चाळी बांधण्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरु आहे. आतापर्यंत पंधराशेहून अधिक गाळे आणि घरे बांधण्यात आली असून भूमाफियांना या परिसराला म्हात्रेवाडी असे नाव दिले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या परिसरात खाजण जमीन तसेच तिवरांची झाडे होती. भूमाफियांनी तिवरांची झाडे तोडून त्याठिकाणी मातीचा भराव करून मोठ्या प्रमाणावर बेकायदा चाळी बांधल्या आहेत. आता तर हजारो कुटुंबे याठिकाणी राहवयास आली आहेत.

महापालिकेने या अनधिकृत वसाहतीमध्ये जाण्यासाठी चक्क रस्ता तयार करून दिला आहे. तसेच स्ट्रीट लाईटसह पिण्याचे पाणीही पुरवले आहे. घरे आणि गाळ्यांना घरपट्टीही लावण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करू नये असे हायकोर्टाच्या नागपूर खंडापिठाचे निर्देश असतानाही महावितरणने वीज पुरवठा केला आहे. म्हात्रेवाडीतील बेकायदा बांधकामांना थेट महसूल, महापालिका, महावितरणचा वरदहस्त लाभल्याने कोणतीही कारवाई होत नव्हती.मात्र, गेल्यावर्षी तिवरांची झाडे तोडून भराव केल्याचा मुद्दा गाजल्यानंतर तहसिलदारांनी याठिकाणी जागेची मोजणी केली होती. तेव्हा मोठ्या प्रमाणावर झालेली अनधिकृत बांधकामे उजेडात आली होती. महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, उपायुक्त किशोर गवस यांच्या आदेशानुसार वालीव प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मोहन संखे यांनी आपल्या पथकासह बुलडोझर घेऊन कारवाई केली. या कारवाईत १९ घरे आणि २७ गाळे जमिनदोस्त करण्यात आले.दरम्यान, या परिसरात पंधराशेहून अधिक गाळे आणि घरे बांधण्यात आलेली आहेत. महापालिकेने त्यातील फक्त ४६ गाळे-घरे पाडली आहेत. उर्वरित अनधिकृत बांधकामे पाडली जाणार का, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला आहे. याठिकाणी काही नेत्यांसह सरकारी अधिकार्‍यांचा सहभाग असल्याने थातूरमातूर कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -