भाईंदर :- मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला करून पळून जाणार्या नशेडी आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. मीरा- भाईंदर आणि वसई – विरार आयुक्तालयातील गुन्हे शाखेची सात पथके आणि मिरारोड, नया नगर व काशीमिरा पोलोसांची तीन पोलिसांची पथके असे एकूण १० पथके आणि १०० पोलीस अधिकारी कर्मचार्यांनी ही कारवाई केली. सीसीटीव्हीच्या तांत्रिक माध्यमातून आरोपीचा छडा लावण्यात आला. आरोपी हा पश्चिम बंगाल येथे पळून जाण्याचा तयारीत असतानाच त्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ( सीएसएमटी ) येथून ताब्यात घेत अटक केली आहे. तर आरोपीला ताब्यात घेत असतानाही आरोपी पोलिसांना सहजासहजी हातात येत नव्हता.अखेर २४ तासाच्या आतच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा युनिट -१ ला यश आले आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उप आयुक्त गुन्हे अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-१ काशिमीराचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे व पुष्पराज सुर्वे, सहायक फौजदार राजु तांबे, संदीप शिंदे, पोलीस हवालदार अविनाश गर्जे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, सचिन हुले, सुधिर खोत, विकास राजपुत, पोलीस अंमलदार प्रशांत विसपुते, संतोष चव्हाण तसेच गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.अधिक तपास निरीक्षक राहुलकुमार पाटील हे करत आहेत.
काय आहे प्रकरण?
मीरा- भाईंदर मध्यवर्ती गुन्हे शाखा कार्यालयात रविवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी हैफुलअली कालूअली शेख याला मोबाईल चोरी व सायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने ताब्यात घेतले होते. प्रथमतः तो पोलिसांना सहकार्य करत होता. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास कर्तव्यावर असलेले एक पोलीस कर्मचारी जेवण आणण्यासाठी गेले असता आरोपीने पोलीस जयकुमार राठोड यांच्यावर खुर्चीच्या खालील लोखंडी रॉड काढत डोक्यात जीवघेणा हल्ला केला. जबर मार लागल्याने त्यांना वोक्खार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.