वसईः महावितरणच्या शिकाऊ कर्मचार्याच्या मृत्यूप्रकरणी वालीव पोलिसांनी महावितरणच्या विद्युत सहाय्यकासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षेची काळजी न घेता कामासाठी पाठवून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी या दोघांना जबाबदार धरण्यात आले आहे. वसईच्या उमेळमान गावात राहणारा अभिजित लकेश्री (२२) हा महावितरणमध्ये मागील एक वर्षापासून शिकाऊ लाईनमन काम करत होता. २८ ऑगस्ट रोजी वसई पूर्वेतील सातिवली येथे विजेच्या खांबावर वीज दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेलेल्या अभिजीतचा विजेचा झटका लागल्याने मृत्यू झाला होता.
याप्रकरणी चौकशीनंतर वालीव पोलिसांनी महावितरणचे विद्युत सहाय्यक समीर अब्दुल आणि सहाय्यक लाइनमन माधव तोमरे या दोघांविरोधात लकेश्री याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कलम ३०४ (अ) आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. लकेश्री याचे काम सायंकाळी ६ वाजता संपले होते. तरीदेखील तोमरे यांनी त्याला रात्रपाळी करण्यास सांगितले. विजेच्या खांबाचा विद्युतप्रवाह पूर्णपणे खंडित झालेला नसतानाही अब्दुल याने लकेश्री याला विद्युत दुरुस्तीसाठी पाठवले होते. तसेच त्याला सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून कोणतीही साधने न देता त्याला खांबावर वीज दुरुस्तीचे काम करण्यास सांगितल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे.