भाईंदर :- मीरा -भाईंदरमध्ये वायुसह ध्वनी प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी असलेली हवेची गुणवत्ता ९६ वरून थेट १३० वर पोहोचली आहे, अशी माहिती पालिकेनी दिली आहे. एकीकडे दिवसेंदिवस सातत्याने प्रदुषणात वाढ होत असल्याने केवळ रात्रीला ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने बजावल्यानंतरही मीरा- भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाल्याने वायूसह ध्वनी प्रदूषणातही वाढ झाल्याचे पुन्हा निदर्शशनास आले आहे. रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार या सलग मागच्या चार दिवसांपासून शहरात तब्बल कोट्यवधी रुपयांचे फटाके फुटल्याची माहिती आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आल्याने मीरा- भाईंदर शहराची हवेची गुणवत्ता पातळी पुन्हा खालावली आहे. हवेची गुणवत्ता पातळी पुन्हा १३० वर जाऊन पोहोचली आहे.
रात्री ८ ते १० पर्यंत फटाके फोडण्याबाबतच्या सूचना असतानाही मध्यरात्री नंतरही फटाक्याची आतिषबाजी सुरु होती. त्यामुळे शहराची हवा पुन्हा प्रदुषित झाली आहे. दिवाळीपूर्वी काही दिवस अगोदरच समाधानकारक श्रेणीत असलेली शहराच्या हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा ढासळली आहे. गेल्या काही दिवसांपासून मीरा- भाईंदरची हवेची पातळी दिवसेंदिवस खराब होताना दिसत आहे. त्यातच दिवाळीत फटाके फोडण्याचे प्रमाण वाढल्याने हवेची गुणवत्ता आणखी ढासळली आहे. दिवाळीपूर्वी अवकाळी पावसामुळे हवेतील धुलिकणांचे प्रमाण कमी झाल्याने हवेची पातळी किंचित सुधारली होती. पण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तुफान आतीषबाजीमुळे हवेची पातळी पुन्हा खालावली आहे.