डहाणू: गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे डहाणू तालुक्यातील मच्छीमार आणि मासळी खवय्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कडाक्याची थंडी, ढगाळ हवामान आणि अनियमित वारे यामुळे डहाणू खाडीतील मासेमारी बंद झाली असून, मच्छीमारांच्या बोटी खाडीकिनारी उभ्या आहेत.बाजारात मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. उपलब्ध होणार्या मोजक्या मासळी प्रजातींमुळे मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. परिणामी सामान्य खवय्यांच्या जेवणातील मुख्य पदार्थ महागड्या भावामुळे गायब होण्याच्या स्थितीत आहे.
मासेमारी ठप्प झाल्याने मच्छीमारांच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला आहे. डहाणू, वाणगाव, चिंचणी आणि अन्य खाडीकिनारी भागातील शेकडो मच्छीमार कुटुंबांची रोजीरोटी या व्यवसायावर अवलंबून आहे. वातावरणातील बदलामुळे त्यांच्या हाताला काम नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. सुकी मासळी तयार करणार्या व्यवसायांवर देखील या परिस्थितीचा परिणाम झाला आहे. बाजारात सुक्या मासळीचा तुटवडा निर्माण झाला असून, ती देखील महागड्या दराने विकली जात आहे. हवामानातील अनियमित बदल आणि समुद्रातील तापमानात होणार्या चढ-उतारामुळे मासेमारीच्या सिजनमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. हा बदल दीर्घकालीन असेल, तर मच्छीमारांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पर्याय शोधावा, असे मत मत्स्य संशोधन तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.