महाराष्ट्राच्या पाच मराठमोळ्या कन्या करणार जगावेगळे धाडस

जेणेकरून गिर्यारोहणाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलून जाईल आणि या साहसी खेळाची वेगळी ओळख भारतासमोर येईल.

वसईः महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पाच हिरकणी जगावेगळे धाडस करणार आहेत. हिमालयातील दोन शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार या पाच गिर्यारोहक तरुणींनी केला असून कोणाचीही मदत न घेता ते ही मोहिम फत्ते करणार आहेत. मनिषा वाघमारे (औरंगाबाद) ,हर्षाली वर्तक (वस‌ई) प्राजक्ता घोडे (मुंबई) ,गौतमी देशपांडे (मुंबई)  व श्वेता मोरे (ठाणे) अशी या पाच महिला गिर्यारोहकांची नावे आहेत. या महिला गिर्यारोहकांनी देश-विदेशातील अनेक अवघड अशा मोहिमा लिलया पार केल्या आहेत. आता या गिर्यारोहक जुलै २०२३ मध्ये हिमालयातील स्पिती व्ह्यलीमधील समुद्रसपाटीपासून ६००० मीटर उंचावरील  दोन शिखरे सर करणार आहेत. माऊंट दावा कांग्री ( उंची ६१४० मीटर) व माऊंट लाग बरचे ( उंची ६००० मीटर) अशी या दोन शिखरांची नावे असून या मराठमोळ्या हिरकणी कोणाचीही मदत किंवा वाटाड्या,शेर्पा यांना सोबत न घेता मोहिमेवर निघणार आहेत.

एक आगळावेगळा गिर्यारोहणाचा उपक्रम कदाचित महाराष्ट्रातील गिर्यारोहक तरुणींकडून असा प्रयत्न पहिल्यांदाच होत असेल.या पाच जणींना रस्ता दाखवणारा हिमालयीन वाटाड्या नाहीकिंवा सामान उचलण्यासाठी मदतनीस नाही. जेवण बनवणारा कुक नाही फक्त या आधुनिक हिरकणी आणि अथांग हिमालय, स्पिती व्ह्यली मधील दोन शिखरे सर करणार आहेत. या अनोख्या मोहिमेचे आयोजन महाराष्ट्रातील नावाजलेली माऊंटन स्पोर्ट्स अकॅडमी चे नंदू चव्हाण सांभाळणार आहेत.  महिला दिनी या उपक्रमाची त्यांनी घोषणा केली असून जेणेकरून गिर्यारोहणाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलून जाईल आणि या साहसी खेळाची वेगळी ओळख भारतासमोर येईल.

अनोख्या आणि साहसी मोहिमेत सहभाग घेणाऱ्या गिर्यारोहिकांचा परिचयः

० मनिषा वाघमारे (औरंगाबाद)

 मराठवाड्यातील पहिली यशस्वी गिर्यारोहक. जगातील सर्वात मोठे शिखर एव्हरेस्ट सर करणारी महिला गिर्यीरोहक. सह्याद्री आणि हिमालयातील साधारण दिड दशकाचा अनुभव. या मोहिमेचे नेतृत्व करणार आहे.

० हर्षाली वर्तक (वसई)

वसईची गिरीकन्या म्हणून ओळख असलेली. देश – विदेशात झेंडा रोऊन आलेली तसेच अनेक मोहीमेचे प्रतिनिधीत्व केलेली. साधारण दिड दशकाचा अनुभव असलेली एक उत्तम गिर्यारोहिका.

०प्राजक्ता घोडे

स्पोर्ट्स क्लाईबिंगमध्ये उत्कृष्ट कार्य करणारी तसेच या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी मेहनत करणारी. महाराष्टातील अनेक सुळके हिने लिलया सर केले आहेत. तसेच एक दशकाचा अनुभव जिच्याकडे आहे तिचाही यात समावेश आहे.

०गौतमी देशपांडे

सह्याद्रीसोबत हिमायलातही जिचा वावर आहे. हिमालयात एकटे फिरण्याचा अनुभव असलेली. एक दशकाचा गिर्यारोहणातील अनुभव असलेली.

० श्वेता मोरे

वयाने सर्वात लहान परंतु सह्याद्री आणि हिमालयामध्येमध्ये  फिरून स्वतःची अशी वेगळी ओळख तयार केलेली. हिचा ही या टिममध्ये समावेश करण्यात आला आहे.