मनोर: अन्न व औषध प्रशासनाच्या कोकण विभागाच्या सह आयुक्तांच्या निर्देशानुसार दिवाळी सणाच्या तोंडावर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली होती.अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त दत्ता साळुंखे आणि अन्न निरीक्षक अभिनंदन रणदिवे यांनी पालघर जिल्ह्यातील आस्थापनांची तपासणी केली. कोकण विभागाच्या सह आयुक्तांच्या निर्देशानुसार मनोर वाडा रस्त्यावरील टेन गावातील राज ऑइल मिल्समधील खाद्यतेलाच्या साठ्याची तपासणी करण्यात आली.यावेळी कंपनीमध्ये एक लिटर क्षमतेच्या तेलाच्या डब्यांमध्ये फोर्टिफिकेशन न करता खाद्यतेल साठवणूक करण्यात येत असल्याचे आढळून आले.
खाद्य तेलामध्ये फोर्टिफिकेशन करण्यासाठी व्हिटॅमिन ए आणि डी मिसळले जात असल्याची माहिती तेलाच्या डब्यावरील स्टिकरमध्ये छापण्यात आली असताना प्रत्यक्ष फोर्टिफिकेशन केले जात नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत आढळून आले. ही कारवाई अन्न औषध प्रशासनाच्या कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात पालघर जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त साळुंखे यांच्या निर्देशानुसार अन्न निरीक्षण अधिकारी अभिनंदन रणदिवे यांच्या पथकाने केली आहे. खाद्यतेल खरेदी करणार्या ग्राहकांची दिशाभूल केल्या प्रकरणी अन्न सुरक्षा मानदे कायद्याच्या कलम 23,24,26 आणि 27 नुसार साठा सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. प्रयोगशाळेच्या अहवालात खाद्य तेलाचा दर्जा सुमार आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल,किंवा नमुन्यातील खाद्य तेल खाण्यासाठी असुरक्षित आढळल्यास कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त दत्ता साळुंखे यांनी दिली.तसेच याबाबत राज ऑइल मिल्स कंपनी व्यवस्थापनाकडून माहिती घेतली असता त्यांनी अशा प्रकारची कारवाई झाली नसल्याचे सांगितले.