भाईंदर :- मीरा- भाईंदर महानगरपालिकेचे नवनियुक्त पालिका आयुक्त संजय काटकर यांची पालिका मुख्यालयात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन शहरातील विविध विषयांवर चर्चा केली. प्रस्तावित विकास आराखडा तयार करताना मुझफ्फर हुसैन यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्या सूचना, हरकती राज्यशासनाच्या समिती कडे देण्यात आल्या होत्या, त्याची एक प्रत आयुक्तांना यावेळी सादर करण्यात आली.यावर पालिका आयुक्तांनी , स्मशानभूमी व कब्रस्थान, दफनभूमीचा विकास करण्याच्या कामावर वर लक्ष देणार असे म्हटले आहे. हुसेन यांनी नवीन विकास आराखड्यात मेट्रो उत्तनापासून ते गोराई एस्सेल वर्ल्डपर्यंत नेण्याची सुद्धा मागणी केली आहे. सध्याच्या पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक नव्याने होणारे भवन किमान ५०० चौ. मीटर पर्यंत असावे आणि अशी भवने लोकांसाठी असलेल्या सुविधा भूखंडावर बांधू नये व अशी भवने बांधतांना भविष्यात सामाजिक तेढ निर्माण करतील. भवनांचा उद्देश निश्चित करून त्याचा फायदा शहरातील गरीब जनतेला व्हावा,अशी मागणी हुसैन यांनी केली आहे.
पालिका आयुक्त संजय काटकर यांनी सर्व प्रश्नांची, समस्यांची नोंद घेत निश्चितपणे यावर अभ्यास करून कार्यवाही करण्याचे आश्वासन काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले. आम्ही विकासाचे अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले असून यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही, असे हुसैन यांनी स्पष्ट केले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक लिओ कोलासो, एस. ए. खान, जुबेर इनामदार, राजीव मेहरा, अश्रफ शेख, मर्लिन डिसा, गीता परदेशी, रुबिना शेख, फरीद कुरेशी, जिल्हा प्रवक्ते प्रकाश नागणे, कार्याध्यक्ष विकास म्हात्रे, राकेश राजपुरोहित, महिला अध्यक्ष रूपा पिंटो, युवक अध्यक्ष सिद्धेश राणे, कुणाल काटकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.