वसई : आयकर विभागात चालक म्हणून काम करणार्या एका भामट्याने चक्क आयकर अधिकारी असल्याचे भासवून अनेक तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. गुन्हे शाखा ३ च्या पथकाने या तोतया इमसाला अटक केली आहे. आतापर्यंत त्याने ४५ जणांना नोकरीच्या नावाखाली फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नालासोपारा येथील एका तरुणीला रिंकू शर्मा (३३) या तोतया इसमाने आयकर आयुक्त असल्याचे सांगून नोकरी लावण्यासाठी १५ लाख रुपये घेतले होते. मात्र नोकरी न लावता तिची फसवणकू केली होती. याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखा ३ च्या पथकाकडे होता. पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून आरोपी रिंकू शर्मा याला गजाआड केले. त्याने आयकर आयुक्त असल्याचे सांगून तब्बल ४५ जणांची २ कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रिंकू शर्मा हा चालक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकू हा अंबर दिवा असलेली गाडी आणि सूट घालून येत होता. त्यामुळे त्याच्या बोलण्यावर लोकांचा विश्वास बसत होता. तरुणांना त्याने नियुक्ती पत्रे, ओळखपत्रे देखील दिली होती. लवकरच नोकरीचा कॉल येईल असे सांगून तो दिशाभूल करत होता.
रिंकू शर्मा याचे शिक्षण ६ वी पर्यंत झालेले आहे. तो मुंबईच्या आयकर विभागात कंत्राटी पध्दतीने १० वर्ष चालक म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याला आयकर विभागातील सर्व माहिती होती. आयकर विभागात कुठले कुठले विभाग असतात, काम कसे चालते, अधिका़र्यांची पदे कशी असतात याची त्याला माहिती होती. त्याने आयकर विभागातील सर्व कागदपत्रे मिळवली होती आणि आपले ओळखपत्र तयार केले होते. त्याचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. त्यामुळे कुणाला त्याच्यावर संशय येत नव्हता. शर्मा याच्याकडे सीबीआय, गृहविभाग, पोलीस, पत्रकार अशी विविध विभागांची २८ बनवाट ओळखपत्रे सापडली आहे. त्याचा देखील त्याने गैरवापर केला असल्याची शक्यता असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.