भाईंदर :- मीरा- भाईंदर शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी कोणतेही शुल्क न आकारता मोफत परवानग्या देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच मंडपासाठी लागणार्या सर्व परवानग्या महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात एक खिडकी योजनेद्वारे देण्यात येणार आहेत. या महापालिकेच्या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांना परवानग्यासाठी लागणार्या कटकटीतून सुटका होणार आहे.
मीरा- भाईंदर महापालिकेने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करूनच परवानगी देण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले. दरवर्षी गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगी घेण्यासाठी अनेक विभागात चकरा माराव्या लागतात. यामध्ये त्यांचा वेळ व पैसा खर्च तर होतो त्यामुळे परवानगी मिळण्यास उशीर होतो. या सर्व त्रासातून सुटका करण्यासाठी एक खिडकी योजना व मंडप शुल्क मोफत करण्याची मागणी गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळाकडून करण्यात येत होती. त्यानुसार महापालिकेने मंडप परवानगीसाठी एक खिडकी योजना व मंडप शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
मंडळांसाठी अष्ट अटी शर्ती
1) धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या मंडळांनाच मंडप परवानगी दिली जाणार आहे.
2) उत्सवासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळण्यासाठी सहा प्रभाग कार्यालयात एक खिडकी योजनेची व्यवस्था महापालिकेने केली आहे.
3)मंडळाने प्रभाग कार्यालयाकडे अर्ज केल्यानंतर तो पालिका कर्मचार्यांकडून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस, अग्निशमन विभाग यांच्या परवानगीसाठी ई-मेलद्वारे पाठवण्यात येणार आहे.
4) सर्व विभागांच्या परवानग्या आल्यानंतरच सहायक आयुक्तांकडून परवानगी दिली जाणार आहे.
5) सहायक आयुक्तांनी दिलेल्या मुदतीतच परवानगी देण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
6) मंडप अथवा स्टेजचे आकारमान रस्त्याच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त करू नये, आठ फूट अथवा त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यावर मंडपासाठी परवानगी दिली जाणार नाही.
7) मंडप अथवा स्टेज उभारणीसाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते खोदू नयेत, सिमेंट रस्ते असलेल्या ठिकाणी वाळूने भरलेल्या ड्रममध्ये मंडपाचे बांबू उभारावेत, गणेशोत्सवाच्या प्रवेशद्वाराजवळ केवळ एकच बॅनर लावण्यात यावा, अन्य जागी कमान अथवा बॅनर लावण्यात येऊ नये.
8) ध्वनी क्षेपकाची परवानगी स्थानिक पोलीस ठाण्यातून घ्यावी , तसेच ध्वनी अथवा अन्य प्रदूषण होणार नाही, याची जबाबदारी मंडळाची असणार आहे. या नियमांचे पालन न करणार्या मंडळांवर महापालिकेकडून कायदेशीर कारवाई केली जाईल अशा शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांना सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत.