शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पुन्हा गेल गॅस पाईपलाईनचे भूत  

पालघर जिल्ह्यातून गेल कंपनीची गॅस पाईपलाईन जात असून या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून हरकती किंवा आक्षेप घेण्याचे काम सुरू आहे.

पालघर जिल्ह्यातून गेल कंपनीची गॅस पाईपलाईन जात असून या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून हरकती किंवा आक्षेप घेण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीतून हे प्रकल्प जात असून शेतकऱ्यांच्या मानगुटीवर प्रकल्पाचे भूत बसल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पालघर व ठाणे हे शेतीप्रधान जिल्हे आहेत. या भागात भातपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. वाडा व मुरबाड येथील कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. वाडा कोलम या भाताचा वाणाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भातपिकाबरोबर येथील शेतकरी कडधान्य, फळबागा, फुलशेती व फळशेती अशी विविध उत्पादने घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. शेती हा एकमेव उद्योग येथील नागरिक करतात. असे असताना विकासाच्या नावाखाली या जिल्ह्यातून अनेक प्रकल्प यापूर्वी गेले आहेत. तर काही प्रकल्प आता जात आहेत. यापूर्वी उच्च दाबाची तीन विद्युत वाहिनी, गेल गॅस  वाहिनी, रिलायन्स गॅस वाहिनी, असे अनेक प्रकल्प या जिल्ह्यात झाले असून शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीतून हे प्रकल्प गेले आहेत.
एकाच जागेतून नेहमीच पाईपलाईन किंवा विद्युत वाहिन्या नेऊन मौल्यवान जमिनीचे मूल्य शून्यात येते. सरकारने हे प्रकल्प राबवताना जमिनीखालून नेले पाहिजेत जेणेकरून शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही. तसेच विकासालाही अडथळा निर्माण होणार नाही. मात्र अंडरराऊंडचा खर्च कित्येक पटीने असल्याने शेतकऱ्यांच्या बोकांडी हे सर्व प्रकल्प मारले जातात.
– श्रीकांत भोईर, सामाजिक कार्यकर्ते
तालुक्यातील खरीवलीतर्फे कोहोज या गावातील शेतकऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. गॅस वाहिनी दहेज (गुजरात) येथून नागोठणे (महाराष्ट्र) अशी जात आहे. यात पालघर व ठाणे हे दोन जिल्हे बाधीत होणार असून हा प्रकल्प पुढे येऊ घातल्याने सुपीक जमिनीची अक्षरशः दुर्दशा होणार आहे. दरम्यान, शेतकरी या प्रकल्पाला विरोध करत आहेत. मात्र सरकारपुढे त्यांचे काहीही चालत नसल्याने शेतकरी हतबल आहेत.
तालुक्यात औद्योगिकीकरण झाल्याने जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. असे असताना फक्त किरकोळ नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळते. यामुळे शेतकरी प्रचंड नाराज आहेत. येथे एकरी एरियाप्रमाणे कुठे पाच ते सहा लाख तर कुठे दोन ते तीन लाख रुपये गुंठा भाव आहे. ज्या जमिनीतून प्रकल्प गेला आहे, ती जमीन विकायची असेल तर भाव कमी मिळतो. तसेच जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर इतर हक्कात कंपनीचे नाव लागते. त्यामुळे शेतकऱ्याची द्विधा मनस्थिती झाली आहे. या दोन्ही जिल्ह्यातून असे अनेक प्रकल्प यापूर्वी गेले आहेत. तर अजूनही जात असून येथील शेतकरी देशोधडीला लागला आहे. मात्र शेतकऱ्यांना कोणी वाली नसल्याने मुकूटपणे  शेतकरी हे सहन करत आहे.