विक्रमगड तालुक्यातील गावीतपाडा नळ पाणीपुरवठा योजना रखडली

ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजना अंतर्गत विक्रमगड तालुक्यातील गावीतपाडा नळ पाणीपुरवठा योजना २०१६-१७ अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे.

ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजना अंतर्गत विक्रमगड तालुक्यातील गावीतपाडा नळ पाणीपुरवठा योजना २०१६-१७ अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. नळ पाणीपुरवठा योजनेचे काम बुधरानी एजन्सीला मिळाले असून या कामाचे सबठेकेदार म्हणून पालघर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे असूनही काम मात्र अपूर्ण अवस्थेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विक्रमगड तालुक्यातील अनेक गावे मार्च, एप्रिल महिन्यात पाणी टंचाईने ग्रासली जातात. यापैकी गावीतपाडा हे सुद्धा गाव आहे. गावातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत २०१६-१७ मध्ये जवळपास ४२ लाख रूपयाची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केली. या योजनेचे काम बुधरानी एजन्सीने सब ठेकेदाराला दिले आहे. हे काम सब ठेकेदाराने ३ वर्षांपासून अपूर्ण ठेवल्याने येथील लोकांना पाण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागताना दिसत आहे. ही नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण केलेली नसल्याने गावीतपाडा या गावाला अजूनही पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

गावीतपाडा नळ पाणीपुरवठा योजना काही तांत्रिक अडचणीमुळे अपूर्ण अवस्थेत आहे. ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.
– ज्ञानेश्वर सांबरे, उपाध्यक्ष जिल्हा परिषद (पालघर)

जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे हे या नळपाणीपुरवठा योजनेचे सब ठेकेदार आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले आहे. त्यामुळे नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण होईल का?, असा प्रश्न करत ही नळ योजना पूर्ण करण्याची मागणी महिलांकडून केली जात आहे. ही नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण होत नसेल तर संबंधित बुधरानी एजन्सीला काळ्या यादीत समाविष्ट करावे, अशीही मागणी केली जात आहे.

गावीतपाडा नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करून पाणीटंचाई ताबडतोब दूर झाली पाहिजे. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.
– सिंधू भोये, माजी जिल्हा परिषद सदस्य

हेही वाचा –

Attack on Owaisi: AIMIM च्या ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी १०१ बकऱ्यांची कुर्बानी