जव्हार नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा लांबणीवर

जव्हार नगरपरिषदेची १८ नोव्हेंबरची सर्वसाधारण बैठक लांबणीवर टाकण्यात आली असून, ही बैठक २४ नोव्हेंबर रोजी घेणार आहे.

जव्हार नगरपरिषद

जव्हार नगरपरिषदेची १८ नोव्हेंबरची सर्वसाधारण बैठक लांबणीवर टाकण्यात आली असून, ही बैठक २४ नोव्हेंबर रोजी घेणार आहे. नगरपरिषदेच्या विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी तसेच शहरात झालेल्या विकासकामांचे प्रलंबित असलेले तांत्रिक शुल्क विलंबाने भरण्याबाबत निर्णय या बैठकीत घेण्यात येणार होता. या बैठकीची विषयपत्रिका तसेच कार्यालयीन टिप्पणी योग्य वेळेत मिळाली नसल्याचे अनेक नगरसेवकांनी पत्राद्वारे नगरपरिषदेला कळवून ही बैठक पुढे ढकलण्याची विनंती केली होती. जिल्हा नियोजन समितीची बैठकीमुळे अधिकारीवर्गाला नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याची अडचण होती. या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण सभा २४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेच्या सदस्यांना कळवण्यात आले आहे.

तांत्रिक मंजुरी प्रकरण व इतर अनेक विषयांसाठी जव्हार नगरपरिषदेने १८ नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी ११ नोव्हेंबर रोजी काढलेल्या सर्वसाधारण सभेचा विषयपत्रिकेत ६० विषय ठेवण्यात आले होते. त्यातील विषय क्रमांक ५१ मध्ये नगरपरिषद हद्दीतील विविध विकास कामांचे निधी अभावी राहिलेले तांत्रिक मंजुरीचे शुल्क भरणा करण्याबाबत निर्णय घेण्याचा विषय ठेवण्यात आला आहे. ही विषयपत्रिका बहुतांश नगरसेवकांना उशिराने १५ नोव्हेंबर रोजी देण्यात आली असून सोबत प्रशासकीय टिप्पणी सभेच्या तीन दिवसांपूर्वी देण्यात आली नसल्याने परिषदेतर्फे नेमकी किती कामांसाठी तांत्रिक मंजुरी शुल्काचा भरणा करण्याशिवाय हाती घेण्यात आली आहेत. याचा नगरसेवकांना तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. ही सभा कायद्याला धरून नसल्याचे कारण सांगून ती रद्द करण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली होती.

हेही वाचा –

महासंचालक पदाच्या यादीतून संजय पांडेंचे नाव केंद्राने हटवले