वसई : विरारमध्ये भर रस्त्यात १४ वर्षीय मुलीचा अनोळखी तरुणाकडून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. सध्या बोळींज पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या विकृताचा शोध घेत आहेत.
विरार पश्चिमेला राहणारी एक १४ वर्षांची मुलगी शालेय साहित्य घेण्यासाठी दुकानात गेली होती. रात्री ९ च्या सुमारास एका अनोळखी तरुणाने तिला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला. या प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली होती. अखेर तिने आईला हा प्रकार सांगितला. आईने तात्काळ विरारच्या बोळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संऱक्षण (पोक्सो) कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा अनोळखी तरुण २० ते २२ वर्षांचा आहे. त्याने तोंडाला रुमाल बांधला होता. आम्ही परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती बोळींज पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरातील पालक आणि मुलींमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलींना रस्त्यात अडवून त्यांचा विनयभंग करणारे सिरियल मॉलेस्टर (विकृत) सक्रीय झाले होते. हा तसाच प्रकार असल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.
Girl Molested : विरारमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग
written By My Mahanagar Team
vasai