घरपालघरअखेर ग्लोबलसिटीला पाणी मिळाले

अखेर ग्लोबलसिटीला पाणी मिळाले

Subscribe

ग्लोबलसिटी व एचडीआयएलवासीयांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आमदार हितेंद्र ठाकूर,आमदार क्षितिज ठाकूर यांनी उत्तरे दिली आणि त्यांचे शंकासमाधान करण्याचा प्रयत्न केला.

वसईः यापुढे ग्लोबल सिटीला टँकरच्या पाण्यावर निर्भर राहावे लागणार नाही. आता, आजपासून या परिसराकरता पाणी पुरवठा सुरू करत आहोत, अशी आनंदवार्ता बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ग्लोबलसिटीतील रहिवाशांना दिली. यावेळी जलकुंभात पाणी सोडून या आश्वासनाची ‘वचनपूर्ती करण्यात आली. वसई-विरार महापलिकेला एमएमआरडीए पाणीपुरवठा योजनेतून 185 दशलक्ष लिटर पाणी प्राप्त होणार आहे. ही योजना पूर्णत्वास गेली असून, या योजनेच्या ‘वचनपूर्तीची माहिती ग्लोबल सिटीतील रहिवाशांना देण्याकरता बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून रविवारी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर आणि माजी सभापती प्रफुल्ल साने यांची या सभेला प्रमुख उपस्थिती होती. ग्लोबलसिटी व एचडीआयएलवासीयांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आमदार हितेंद्र ठाकूर,आमदार क्षितिज ठाकूर यांनी उत्तरे दिली आणि त्यांचे शंकासमाधान करण्याचा प्रयत्न केला.

विरार शहरावर प्रेम आहे म्हणून आपण येथे रहायला आलेला नाहीत. तर तुमची ती मजबुरी आहे. मुंबईत रहाणे परवडत नाही म्हणून आपण विरारचा पर्याय स्वीकारलेला आहे, असे सांगत हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. इथे आलेल्यांतील किती जण पुन्हा मुंबईत जातील, याची मला कल्पना नाही. पाच टक्के लोकांची मुले चांगली शिकली-सवरली तर ती जातीलही. इतर आपल्या सर्वांना इथेच रहायचे आहे. तेव्हा एकमेकांच्या सुख-दु:खात वाटेकरी होत, एकमेकांना साथ सोबत करत पुढे जाऊ. विकास साधू, असे सांगत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भविष्यातील पाणी पूर्तीसाठी आपण प्रयत्न करत असल्याची माहिती दिली. १९९१ साली मी प्रथम आमदार झालो तेव्हा या शहराची लोकसंख्या चार लाख इतकी होती. आजघडीला ती २५ लाखांच्या घरात आहे. अन्य शहरांच्या तुलनेत वसई-विरार शहराचा विकास झपाट्याने होत आहे. अर्थात पाण्याची समस्या भविष्यातही कायम राहणार आहे. परंतु पूर्वीच्या तुलनेत पाणी पुरवठा कसा वाढला आहे, असे सांगत त्याची इत्थंभूत माहितीही उपस्थितांना त्यांनी दिली. एका योजनेची पूर्ती झाल्यानंतर लागलीच दुसर्‍या योजनेसाठी पाठपुरावा करणारी वसई-विरार शहर महापालिका ही एकमेव महापालिका असल्याचे आमदार ठाकूर यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

आंदोलने-मोर्चे काढून काही होत नसते. तसे असेल तर आपण सारेच आंदोलने करुया. पाणी हे प्रयत्नांनी येत असते. वसई-विरारच्या पाणी योजनांसाठी आमची टीम अहोरात्र काम करत होती. आज जे विरोधक आंदोलने-मोर्चे काढत आहेत, तेच एकेकाळी वसई-विरारला पाणी देऊ नका, असे सांगत होते. त्यांना या पाणी योजनांची माहिती तरी आहे का?, असा प्रश्न करत सर्व विरोधकांनी एकाच व्यासपीठावर आमच्यासमोर यावे आणि या योजनांची माहिती द्यावी, असे आव्हान आमदार क्षितिज ठाकूर यांनी याप्रसंगी दिले. आम्ही काम करण्यावर भर देतो, मार्केटिंग करण्यावर नाही. पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यासाठी आधी पाण्याची टाकी तर बांधावी लागली ना?. ही टाकी कोणी बांधली? असा प्रश्न करत आमदार क्षितिज ठाकूर यांनी विचारला.या सभेला माजी सभापती सखाराम महाडिक, माजी नगरसेविका रंजन पाटील, कांता पाटील, नगरसेविका सुरेखा कुरकुरे, वासंती पाटील, रिटा सरवैय्या, किरण ठाकूर, प्रशांत चौबळ तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

०००

- Advertisement -

सूर्या पाणी योजना टप्पा-2च्या पूर्ततेसाठी खूप मेहनत घ्यावी लागली. विविध परवानगी, शेतकर्‍यांच्या शंका-समस्यांचे निराकरण आणि वनविभाग, महामार्ग, रेल्वे यांच्या परवानगीत या योजनेला विलंब झाला, अशी खंतही क्षितिज ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली. या योजनेतील पाणी ७७ किलोमीटर लांबहून उचल करण्यासाठी पालिकेला सांगण्यात आले होते. परंतु आम्ही अडून बसलो. इतक्या लांबून पाणी उचल करण्याऐवजी आम्हाला ते वसई-विरार किंवा नालासोपारा फाटा येथून देण्यात यावे, अशी गळ घातली. आमच्या प्रयत्नांना यश आले. यात वसई-विरार महापालिकेचे ७७ कोटी रुपये वाचले. हे पैसे आमच्या खिशात गेले नाहीत. तर ते वसई-विरारच्या विकासावर अर्थात वीज, रस्ते व अन्य मूलभूत सुविधांवर महापालिका खर्च करणार आहे. पाणी टाकीत आले आहे, तर ते जलवाहिनीत का नाही? हा सामान्य नागरिकाने केलेला प्रश्न रास्त आहे. त्यामुळे हे पाणी आजपासूनच सोडले जाईल. शिवाय हे पाणी ग्लोबल व एचडीआयएल अशा सर्वांकरताच असेल, असे आमदार क्षितिज ठाकूर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -