डहाणू: डहाणू समुद्रकिनार्यावर जेलिफिश आढळून आल्यामुळे समुद्रकिनार्यावर पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. साधारणतः ऑगस्ट दरम्यान समुद्रकिनार्यावर “ब्लू बॉटल” प्रजातीच्या जेलिफिश आढळून येतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही डहाणू किनार्यावर जेलिफिश पाहायला मिळत आहेत. डहाणू समुद्र किनार्यावर दरवर्षी जुलै ते ऑगस्ट दरम्यान विविध समुद्री जीव पाहायला मिळतात. यामध्येच जेली फिशचा समावेश आहे. निळ्या रंगाचे पाण्याच्या फुग्याप्रमाने दिसणारे हे जीव सध्या डहाणू किनार्यावर आढळून येत आहेत. “ब्लू बॉटल” हे नाव या जिवाच्या रंग आणि आकारावरून पडले आहे. याची लांबी साधारण 0.8 ते 6 इंच इतकी असते तर त्याच्या निळ्या धाग्यांची लांबी 3 फुटांपर्यंत असते. लहान अळ्या आणि मासे हे या जीवाचे खाद्य आहेत. यांच्या शरीरात एक विशिष्ठ प्रकारचे विष असल्यामुळे याला स्पर्श केल्यास शरीराला इजा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या डहाणू समुद्र किनार्यावर जेलिफिश आढळून येत असून ते दिसायला सुंदर असल्यामुळे त्यांना स्पर्श करण्याचा मोह होऊ शकतो. परंतु स्पर्श केल्यास मानवी शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. “ब्लू बॉटल” जेलिफिश खोल समुद्रात अधिवास करतात. वजनाने हलके असल्यामुळे पावसाळा दरम्यान समुद्रात सोसाट्याचा वारा आणि आंतरिक बदलामुळे हे जीव समुद्राबाहेर फेकले जातात.
1) जेलिफिशच्या अनेक प्रजातींपैकी “ब्ल्यू बॉटल” ही एक विषारी प्रजाती असून यांच्या स्पर्षक पेशींमध्ये विषारी द्रव्य असते. त्यांच्या शरीराला स्पर्श झाल्यास ते दंश करतात. हा दंश वेदनादायी असून दंश झालेल्या भाग लालसर होऊन सुजणे आणि जळजळणे असा त्रास होऊ शकतो.
2) ब्लू बॉटलचा दंश झाल्यास वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. दंश झालेला भाग चोळू नये, दंश झालेल्या भागावर अलगद समुद्राचे पाणी ओतावे किंवा कोमट पाण्याचे बाधीत भाग स्वच्छ धुवून घ्यावा.
3)बाधीत झालेल्या भागास लिंबू, चिंच अथवा चुना लावणे हे उपाय केले जातात. हे उपचार करण्याबरोबरच रुग्णालयात उपचार घेणे आवश्यक आहे.
4) जेलिफिश स्वतःहून हल्ला करत नसून त्यांना स्पर्श झाल्यासच त्यांच्याकडून स्वसंरक्षणासाठी दंश करण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी त्यांच्यापासून स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे.
अफवांवर विश्वास नको
डहाणू समुद्रकिनार्यावर देखील जेलिफिश आढळून येत असून यांच्याविषयी अनेक तर्क वितर्क लावून अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र यांना घाबरून जाण्याचे कारण नसून समुद्रकिनारी फिरताना काळजी घेण्याची गरज आहे. किनार्यावर पाण्याच्या फुग्या सदृष्य काही आढळल्यास त्यापासून लांब रहावे, किनार्यावर फिरताना अनवाणी फिरू नये आणि पाण्याच्या प्रवाहात जाताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.