शासकीय कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,जुनी पेन्शन योजना मागणी

त्यामुळे त्यांनी सोबत आणलेल्या चारचाकींमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. ही समस्या सुमारे एक तास कायम राहिली.

पालघर: राज्यासह पालघर जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आज (मंगळवारपासून) बेमुदत संप पुकारला असून सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र मार्फत राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक, कंत्राटी कर्मचारी इत्यादी या संपात सहभागी झाले आहेत.महाराष्ट्र राज्यातील सर्व संवर्गातील राज्य सरकारी – निमसरकारी – शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी – जिल्हा परिषद कर्मचारी – कंत्राटी कर्मचारी – संगणक हाताळणारे कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी या व इतर सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे व शासन स्तरावरील प्रलंबित असलेल्या विविध मागण्या मान्य करुन घेणे या त्यांच्या मागण्या आहेत. यासाठी पालघर शहरातील जीवन विकास शिक्षण संस्थेच्या मैदानात जिल्हाभरातून जवळपास सर्वच शासकीय विभागाचे 12 हजार शासकीय कर्मचारी एकत्र आले होते. त्यानंतर दुपारी 3 वाजताच्या सुमारास थेट जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक विशाल मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात मोठ्या प्रमाणात शासकीय कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी सोबत आणलेल्या चारचाकींमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. ही समस्या सुमारे एक तास कायम राहिली.

 

नागरिकांची गैरसोय

या संपामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांची मात्र गैरसोय झाली. बेमुदत संपामुळे सर्व तालुक्यांतील तहसील,पंचायत समिती कार्यालय आदी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते.