आजोबाचा नातवावर प्राणघातक हल्ला; नंतर गळफास घेत केली आत्महत्या

डहाणू तालुक्यातील कासा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किन्हवली मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. राजेश आंबात या वक्तीने स्वतःच्या नातवावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले.

डहाणू तालुक्यातील कासा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किन्हवली मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. राजेश आंबात या वक्तीने स्वतःच्या नातवावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीदायक वातावरण तयार झाले आहे. जखमी मुलावर दादरा नगर हवेली येथील विनोबा भावे रुग्णालयात उपचार सुरू असून दोन शस्त्रक्रिया झाल्या असून अजुनही मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. किन्हवली पिंपळपाडा येथील ही घटना असून सविस्तर माहिती अशी की, राजेश आंबात (वय ५२) हा गेल्या एक-दोन महिन्यापासून डोक्यावर परिणाम झाल्याने वेडसर वागत होता.

दरम्यान शुक्रवारी दुपारी ४.३० च्या सुमारास त्यांच्या घराजवळ कोणीही नसताना त्याने बाजूलाच झोपलेल्या साडेतीन वर्षीय तेजस या आपल्या नातवाला पाहिले. वेडसर राजेश आंबात याने स्वतःच्या नातवाच्या पोटावर व खांद्यावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. तेजसच्या पोटावरील वार इतका गंभीर होता की, कोवळ्या वयाच्या तेजसचे पोटातील आतडे बाहेर निघाले होते. इतक्यात घटनेची चाहूल लागताच परिसरातील नागरिक जमू लागल्याने राजेशने घर गाठत स्वतः ला घरात कोंडून घेतले. त्यानंतर राजेशच्या पुतण्याने कासा पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली.

नातवाला गंभीर जखमी करून स्वतःला घरात कोंडून घेणारा राजेश हा अधिकच हिंसक होतोय की काय, अशी भीती परिसरातील व्यक्तींना असल्यामुळे त्यांनी घर उघडण्याचे धाडस न करता पोलिसांच्या येण्याची वाट पाहू लागले. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्यापासून सुमारे ४० ते ४५ किमी लांब असलेल्या किन्हवली गावात जाण्यासाठी पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे व त्यांचे पोलीस पथक निघाले. साधारण ९.३० वाजताच्या दरम्यान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी घटनेचा आढावा घेऊन आपल्या पथकासह राजेशने कोंडून घेतलेल्या घराच्या मागच्या बाजूने घरात प्रवेश केला असता त्यांना घरातील माळ्याच्या लाकडी वाश्याला लटकलेला राजेशचा मृतदेह आढळून आला. घरात कपडे वाळवण्यासाठी बांधलेल्या नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन राजेशने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. यासंबंधी कोणावरही संशय नसून राजेश हा वेडसर असल्यामुळे त्याच्या हातून ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा – 

तुम्ही नैतिकता पाळणार नसाल तर कोथळा काढण्याचा अधिकार,संजय राऊतांचा भाजपला इशारा