सांडपाण्यावर वाढलेल्या गवताचे दुष्परिणाम तुमच्यावर होताहेत….वाचा सविस्तर…

याच जनावरांचे दूध वसई-विरारमधील जनतेला पुरवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी उघडकीस आणला आहे.   

वसई: वसई- विरार महापालिकेच्या नालासोपारा पश्चिमेकडील समेळपाडा, करमाळा, गास, हनुमान नगर परिसरात सांडपाणी वाहून नेणार्‍या नाल्यात बांध घालून ते दूषित पाणी पंपाद्वारे महापालिकेच्या मालकीच्या तसेच शासकीय जागेत सोडून त्याद्वारे गवत शेती करण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. हे दूषित गवत वसई- विरारमधील तबेल्यात दुभत्या जनावरांना पुरवले जाते. दूषित गवत जनावरांच्या आरोग्याला घातक असून याच जनावरांचे दूध वसई-विरारमधील जनतेला पुरवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी उघडकीस आणला आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील नाल्यातील सांडपाणी बांध घालून अडवण्यात आले आहे. हे दूषित, घातक सांडपाणी पंप लावून नाल्याशेजारील महापालिकेच्या आणि सरकारच्या मालकीच्या जागेत सोडून देण्यात येते. त्यापाण्यावर गवत शेती केली जात आहे. येथील दूषित सांडपाण्यातून उगवणारे गवत तबेल्यातील जनावरांसाठी विकले जाते. या गवतामुळे दुभती जनावरे व लहान मुले व सामन्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार तातडीने थांबवावा. यासाठी तातडीने कारवाई करून संबंधितांवर जनतेच्या आरोग्याशी खेळणे तसेच नाल्यावर अतिक्रमण करणे व शासकीय जागेचा गैरवापर करण्याबद्दल गुन्हे दाखल करून नाले मोकळे करून गवत नष्ट करावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

काही मूठभर लोक आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी करत असून त्यावर महापालिका प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुसर्‍या बाजूस सांडपाणी जमिनीत सोडल्याने मोठ्या प्रमाणात डास निर्मिती होत असल्याने जनता प्रचंड त्रासलेली आहे. संध्याकाळी ६ नंतर डासांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भितीही त्यांनी व्यक्त केली आहे.