विरार : कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमांतर्गत पालघर जिल्हयातील प्रत्येक कार्यालयामध्ये ज्या आस्थापनेवर १० किंवा १० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, अशा प्रत्येक कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करून याबाबतची माहिती ऑनलाईन करण्याचे आवाहन जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय पालघर यांच्या विभागाने केले आहे.
समितीमध्ये कार्यालयातील वरिष्ठ महिला अध्यक्ष असावी, महिलांच्या प्रश्नांंशी बांधील असलेल्या किंवा ज्यांना सामाजिक कार्याचा अनुभव व कायद्याचे ज्ञान आहे, अशा कर्मचार्यामधून किमान दोन सदस्य, तसेच अशासकिय संघटना किंवा लैंगिक छळाशी संबंधित प्रश्नांची परिचित असलेली व्यक्ती यामधील एक सदस्य असावा. समितीमध्ये किमान ५० टक्के सदस्य महिला राहतील आणि समितीचा कार्यकाल ३ वर्षांचा राहील.
शासनस्तरावर अंतर्गत तक्रार समितीची माहिती ऑनलाईन अपटेड करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यालयाने अंतर्गत तक्रार समिती स्थापना करण्याची माहिती जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत अ कक्ष क्र. १०८ जिल्हाअधिकारी कार्यालय परिसर, पालघर ([email protected]) येथे सादर करणे आवश्यक आहे. ज्या कार्यालयामध्ये १० पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांनी स्थानिक तक्रार समिती, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय पालघर यांच्याकडे आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन महिला आणि बालविकास विभागाने केले आहे.