शशी करपे, वसईः एमएमआरडीएच्या सूर्या पाणी पुरवठा योजनेतून वसईला पाणी पुरवठा व्हावा यासाठी जून महिन्यांपासून वसईत विविध पक्ष, संघटना आंदोलने करत आहेत. सत्ताधारी खासदारदेखील आंदोलनात सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रविंद्र चव्हाण मात्र मौन बाळगून असल्याने वसईकरांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या वसईला पाण्याची टंचाई असून एमएमआरडीएच्या सूर्या पाणी पुरवठा योजनेतून जूनच्या अखेरीस मिळणारे ७० ते ८० एमएलडी पाणी राजकीय श्रेय घेण्यासाठी राज्यकर्त्यांनी रोखून धरले आहे. पाणी पुरवठा त्वरीत सुरु व्हावा यासाठी वसईत विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी आंदोलने केली, उपोषणही केले. मनसेने काढलेल्या पाणी मोर्च्यात खुद्द शर्मिला राज ठाकरे सहभागी झाल्या होत्या. राज ठाकरे यांनीही एमएमआरडीएला पाणी त्वरीत सुरु करण्याच्या सूचना केल्या होत्या. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांनीही त्वरीत पाणी पुरवठा सुरु करण्याची विनंती एमएमआरडीकडे केली होती पण, त्यानंतरही पाणी पुरवठा अद्याप सुरु करण्यात आलेला नाही. एमएमआरडीएचे अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देऊन वेळ मारून नेताना दिसत आहेत.
सत्ताधारी महायुतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण करायचे असून त्यासाठी चार ते साडेचार महिने पंतप्रधानांचा मुंबई दौरा होत नसल्याने लोकार्पण लांबणीवर पडू लागले आहे. विरार आणि नालासोपारा येथे निघालेल्या पाणी मोर्च्यात शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित स्वतः सहभागी झाले होते. खासदार गावित यांनी पाणी पुरवठा लोकार्पणाच्या दोन तारखाही दिल्या होत्या. अर्थात राज्य सरकार आणि एमएमआरडीएकडूनच तारीख पे तारीख दिली जात असल्याने खासदार राजेंद्र गावित यांचीही कोंडी होत आहे. गेल्या आठवड्यात आगरी सेनेच्या महिलांचे आमरण उपोषण सोडवताना खासदार राजेंद्र गावीत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्वरीत पाणी पुरवठा करण्याचे निर्देश एमएमआरडीएला दिल्याची माहिती देण्यात आली होती. पण, दिवाळी सरल्यानंतरही वसईकरांना पाणी पुरवठा करण्यात एमएमआरडीकडून टाळाटाळ होताना दिसत आहे. एमएमआरडीएकडून दिली जाणारी कारणे न पटणारी असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
दरम्यान, गेल्या चार महिन्यांपासून वसईत पाण्यासाठी विविध आंदोलने होत असताना त्याची साधी दखल घेण्याची तसदी पालकमंत्री रविंद्र चव्हाण घेताना दिसत नाहीत. पाणी प्रश्न वसईकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असताना त्यावर पालकमंत्री रविंद्र चव्हाण लक्ष घालत नसल्याने त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पालकमंत्र्यांच्या पालघर जिल्ह्यात वसई -विरार भाग येत नाही, अशा पद्धतीचे यांचे वागणे असून वसईशी काहीच देणेघेणे नसल्यासारखीच पालकमंत्र्यांची भूमिका असल्याची खंत वसईकर व्यक्त करत आहेत. दुसरीकडे, भाजपच्या हट्टापायी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही वसईकरांची नाराजीचे धनी होताना दिसत आहेत.