टीम पालघरः महानगर टीमः बुधवारी पहाटेपासून कोसळत असलेल्या पावसाने पालघर जिल्ह्याला झोडपून काढले. सकाळपासूनच वसई पाण्याखाली गेली होती. त्यामुळे जिल्हयातील अनेक भागातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता. जिल्ह्यातील जनजीवन विस्कळती झाले होते. पुढील तीन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भरती असल्याने समुद्रकिनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. खबरदारी म्हणून जिल्हयात ठिकठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. बुधवारी वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शाळा, कॉलेज, आश्रमशाळांना सुट्टी देण्यात आली होती. रेड अलर्ट देण्यात आल्याने जिल्हाधिकार्यांनी सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदारांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून मुख्यालय न सोडण्याचे निर्देशही दिले आहेत.
बुधवारी पहाटेपासून जिल्हयात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्या पावसाने वसईला अक्षरशः झोडपून काढले. विरार, नालासोपारा, नवघर-माणिकपूर शहरातील सखल भागासह मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. नालासोपारा शहरातील बैठ्या चाळींमधील घरे आणि मुख्य रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरले होते. वसई पूर्वेकडील भागालाही यावेळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. वसई पूर्वेकडील मीठागर यंदाही पाण्याखाली गेले होते. त्यामुळे एनडीआरएफच्या पथकाने त्याठिकाणी धाव घेतली होती. वसईच्या पश्चिम भागातही अनेक गावांमध्ये पाणी साचले होते. मुंबई-अहमदाबाद हायवेवर पाणी साचून राहिल्याने हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पाणी साचल्याने महावितरणने खबरदारी म्हणून अनेक भागातील वीज पुरवठा काही काळ बंद केला होता. बुधवारी सकाळी वसई तालुक्यात पावसाची सर्वाधिक 153 मि.मि. इतकी नोंद झाली. त्याखालोखाल पालघर तालुक्यात ८३.८ मिमि इतका पाऊस पडला. आठ तालुक्यात ४०० मिमि पावसाची नोंद झाली आहे.
जव्हारमध्ये डोंगरावरील रस्त्यावर पाणी
गेल्या काही तासांपासून जव्हार शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. परिणामी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. शहरातील महत्त्वाचा समजला जाणारा पाच बत्ती परिसर या रस्त्याला मोठाले खड्डे पडल्याने त्या ठिकाणी तळ्याचे स्वरूप आले आहे. विशेष म्हणजे सदर रस्ता हा शहरातील दोन डोंगरांना जोडणारा रस्ता आहे पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी येथे तुटपुंजी व्यवस्था काही गावकर्यांनी निदर्शनास आणून दिली, नगरपरिषद प्रशासनाने हे खड्डे त्वरित बुजवून नागरिकांना ये जा करण्यासाठी रस्ता सुस्थितीत करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याकरिता भर पावसात सिमेंट काँक्रीटचा थर पसरविण्यात आला होता. परंतु पावसाने हा थर वाहून गेला असून नागरिकांच्या विकासाकरिता वापरण्यात येणारा पैसा नगरपरिषद प्रशासन अशा प्रकारे पाण्यात घालत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
धबधब्यांवर कलम 144 लागू
जव्हार तालुक्यात मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यटक या भागात येण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक पर्यटक हे पाण्यात उतरून आपला जीव धोक्यात घालत असतात. त्यांची मजा सजा होऊन अनेक पर्यटकांचे प्राण गेले आहेत. यावर उपाय म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुशी सिंह यांनी दाभोसा व काळमांडवी धबधबा येथे 144 कलम लागू केले आहे.पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार जव्हार पोलीस ठाणे हद्दी अंतर्गत येत असलेल्या काळ मांडवी व दाभोसा धबधबा येथे पर्यटकांकरिता धोक्याची सूचना असलेले फलक नव्याने लावण्यात आले आहेत. शिवाय पर्यटकांनी जर नियम मोडण्याचा प्रयत्न केलाच तर फौजदारी गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
झाडावर दुचाकी आदळून चालकाचा मृत्यू
जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असून सर्व ठिकाणी पाणीच पाणी साचले आहे. या पावसामुळे एडवण येथील सावरपाडा येथे रस्त्याच्या कडेला असलेले भलेमोठे झाड उन्मळून पडले. त्याच वेळेत डोंगरे गावातील विलास किनी(44) हे आपल्या मुलीसोबत दुचाकीवरून जात होते. मुसळधार पावसामुळे किणी यांना झाड न दिसल्याने त्या झाडावर दुचाकीसह आदळून त्यांचा अपघात झाला. या अपघातात विलास किणी यांचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेली मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक पोलीस आल्यानंतर पंचनामा करून झाड हटवून रस्ता सुरळीत करण्यात आला. एडवण सावरपाडा व भादवे येथे झाडे पडल्यामुळे एडवण ते सफाळे रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद झाला होता. एडवण गावातील एसटी ड्रायवर सचिन तरे यांनी सदरची बाब स्थानिकांच्या लक्षात आणून दिल्यानंतर पालघर जिल्हा वाहतूक सेना उपाध्यक्ष आशिष पाटील व सुजित चौधरी यांनी स्वतः कडची कटर मशीन घेऊन स्वतः झाडे कापून रस्ता मोकळा करून दिल्याने सर्वांनी त्यांचे कौतुक केले.
सफाळ्यात रस्ते वाहतुकीचे तीन तेरा
गेल्या 3 ते 4 दिवस सलग सुरू असणार्या पावसाने बुधवारी मध्यरात्रीनंतर जोरदार कोसळायला सुरुवात केली. त्यामुळे सफाळे भागातील माकुणसार, माकणे, मांजूर्ली, टेभिखोडवे,कपासे ते केळवे रोड, रोडखड, देऊळ पाडा आदी ठिकाणच्या सखल भागात तसेच वाहतुकीच्या रस्त्यावर पाणी साचले होते. यामुळे माकुणसार आणि माकणे येथील रस्ते वाहतूक बंद पडली होती. ठिकठिकाणच्या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने तसेच वृक्ष उन्मळून पडल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली. पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या विरार ते डहाणू भागातील अनेक मोर्यांना पूर आला होता. मात्र त्याचा रेल्वे वाहतुकीवर विशेष फरक जाणवला नाही. रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने मात्र, पहाटेच्या सुमारास नोकरदारवर्ग, विद्यार्थी, दूध व भाजी विक्रते यांचे बेहद हाल झाले. तर जिल्हा प्रशासनाने अतिमुसळधार पावसाचा इशारा असतानाही उशिराने शाळा बंद करण्याचे आदेश जारी केल्याने शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण होते. सफाळे तांदुळवाडी मार्गावर टेम्पो पलटी झाल्याने वाहतूक बंद झाली होती. चालक जखमी झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, मेजर शर्मा, मेजर शेलके, भोये, मोरे भावर आदींनी घटनास्थळी दाखल होऊन टेम्पोला बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
आज गुरुवारी शाळा, कॉलेजना सुट्टी
प्रादेशिक हवामान विभागाने पालघर तालुक्यात गुरुवारी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे गुरुवारी वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये, सर्व आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, अंगणवाड्यांसह व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रांच्या शैक्षणिक संस्थांना जिल्हाधिकार्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.