आरोग्य चाचण्या आता सवलतीच्या दरात

या चाचण्या रुग्णांच्या आर्थिक क्षमतेपलीकडे असल्याने अशा प्रकारची चिकित्सा-चाचणी केंद्र महापालिका रुग्णालयांतच सुरू करावीत, अशी मागणी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख यांनी केली होती.

वसई :  गरीब गरजू रुग्णांची आरोग्य तपासणीसाठी होणारी लूट लक्षात घेऊन वसई -विरार महापालिकेने एमआरआय, सीटी स्कॅन व अन्य महत्त्वाच्या चाचण्या खासगी लॅबमधून पन्नास टक्के दरात करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी वसई -विरारमधील तीन खासगी लॅबशी करार करण्यात आला आहे.
दोन हजार कोटींचे आर्थिक बजेट असलेल्या वसई-विरार महापालिकेच्या चार रुग्णालये व २१ आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक चिकित्सा आणि चाचणी केंद्र नसल्याने महापालिकेचे डॉक्टर या चिकित्सा व चाचणी खासगी लॅबमधून करून घेण्यासाठी रुग्णांना भाग पाडत होते. या चाचण्या रुग्णांच्या आर्थिक क्षमतेपलीकडे असल्याने अशा प्रकारची चिकित्सा-चाचणी केंद्र महापालिका रुग्णालयांतच सुरू करावीत, अशी मागणी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख यांनी केली होती.

रुग्णांची होणारी आर्थिक लूट व आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेता महापालिकेने या सुविधा तातडीने रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांत उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देशमुख यांनी आयुक्त अनिलकुमार पवार यांना दिला होता. मागील काही वर्षांत वसई-विरार शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. साहजिकच आरोग्य सुविधांच्या मागणीतही वाढ होत आहे. वसई व विरारच्या तुलनेत नालासोपारा परिसरात लक्षणीय प्रमाणात गरीब आणि गरजू नागरिकांची लोकवस्ती आहे. यातील बहुतांश नागरिक हे रोजंदारी, गृहउद्योग व नोकरीवर अवलंबून असलेले आहेत. परिणामी आरोग्य काळजीकरिता आवश्यक असलेला खर्च करणे त्यांच्या खिशाला परवडणारा नाही. कित्येक नागरिक मुंबईतील नायर, सायन किंवा केईएम रुग्णालयांत उपचारार्थ दाखल होतात. यात त्यांची मानसिक, आर्थिक व कौटुंबिक फरफट होते.

शारीरिक अनेक सूक्ष्म तपासणी करताही नागरिकांना खासगी रुग्णालये किंवा लॅबवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा चाचणीनिमित्ताने ही रुग्णालये व लॅब गरजू रुग्णांची आर्थिक लूट करत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आलेले आहे. हा आर्थिक भुर्दंड रुग्णांच्या क्षमतेपलीकडे असतो. रक्त तपासणीसारख्या छोट्या चाचणीही खासगी लॅबमधून करून घ्याव्या लागत आहेत. ही अडचण लक्षात घेता वसई-विरार महापालिकेच्या विशेष करून नालासोपारा येथील रुग्णालयांत सीटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, डायग्नोस्टिक सेंटर व बायोकेमिस्ट्रीअनुषंगिक चाचणी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. गांभीर्य आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन वसई-विरार महापालिकेने अखेर आवश्यक चिकित्सा व चाचणी केंद्रांबाबत तातडीने पावले उचलली आहेत. त्यासाठी ‘निदान, ‘लाईफ स्कॅन आणि ‘युनिक डायग्नोस्टिक या तीन खासगी लॅबसोबतची करार प्रक्रिया नुकतीच पार पाडण्यात आली आहे. या लॅबच्या माध्यमातून गरजू रुग्णांना ५० टक्के सवलतीच्या दरांत एमआरआय, सीटी स्कॅन व अन्य महत्त्वाच्या चाचण्या करून घेता येणार आहेत, अशी माहिती वसई-विरार महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी दिली.