घरपालघरविरारमधील दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत द्या

विरारमधील दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत द्या

Subscribe

खारघर येथील उष्माघाताच्या बळींना ज्या पद्धतीने सरकारने मदत दिली. त्याच अनुषंगाने या दुर्घटनेतील पीडितांचाही विचार मानवतेच्या दृष्टिकोनातून व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वसईः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विरारमध्ये निघालेल्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यात काही जण जखमीही झाले होते. या मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना सरकारी मदत मिळावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. खारघर येथील उष्माघाताच्या बळींना ज्या पद्धतीने सरकारने मदत दिली. त्याच अनुषंगाने या दुर्घटनेतील पीडितांचाही विचार मानवतेच्या दृष्टिकोनातून व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध ठिकाणी तरुणांनी उत्स्फूर्त मिरवणुकाही काढल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला विरार पूर्व परिसरातील नागरिकांनीही मिरवणूक आयोजित केली होती. मात्र या मिरवणुकीला गालबोट लागले. मिरवणूक ऐन भरात असताना विजेचा धक्का लागून रुपेश सुर्वे आणि सुमित सूद या दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर काहीच दिवसांत खारघर येथे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित श्री सदस्यांपैकी काहींचा उष्माघाताने मृत्यू झाला. अनेक जण उष्माघाताने त्रस्त होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना राज्य सरकारने मुख्यमंत्री निधीतून तातडीने मदत जाहीर केली. याबाबत पत्र लिहून आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेबद्दल त्यांचे आभार मानले. याच संवेदनेने विरार येथील मृतांच्या नातेवाईकांना व जखमींना मदत करावी, अशी विनंतीही आमदार ठाकूर यांनी केली आहे. बहुजन विकास आघाडीने या मृतांच्या नातेवाईकांना आधार देण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न केले आहेत. जखमींवर व्यवस्थित उपचार होतील, याचीही आम्ही काळजी घेतली आहे. मात्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत हा प्रकार घडला, ही दु:खद बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेऊन तातडीची मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -