विरार : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक असतानाच भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडूनच पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना विरार पूर्वेतील विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटप करताना पकडले असून याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत घडलेल्या घटनेवर भाष्य केलं, मात्र निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद मध्येच थांबवली. यानंतर आता हितेंद्र ठाकूर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. (Hitendra Thakur reaction to Vinod Tawde distributing money)
विनोद तावडे यांच्याजवळून पैसे आणि डायऱ्या सापडल्याचा दावा हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी केला. तसेच, तावडे आणि नालासोपाऱ्यातील भाजपचे उमेदवार राजन नाईक यांनी पत्रकारांनी संवाद साधून स्पष्टीकरण द्यावं, यावर हितेंद्र ठाकूर यांच्यासह क्षितिज ठाकूर अडून बसले होते. अखेर तावडे, राजन नाईक, हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी एकत्र प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी तावडे यांनी मोजक्या वाक्यात प्रतिक्रिया देत काढता पाय घेतला. “मतदानादिवशी आचारसंहितेसंदर्भातील नियमांची माहिती मी दिली. त्यामुळे कुठेही आचारसंहितेचा भंग झाला नाही. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी पुढील चौकशी करावी,” असं सांगत हात जोडले आणि हितेंद्र ठाकूर यांच्या पाठीवर थाप टाकत विनोद तावडे पत्रकार परिषदेतून निघून गेले. मात्र पत्रकार परिषद सुरू असतानाच एसपी पौर्णिमा चौगुले-शिर्के यांनी हितेंद्र ठाकूर यांना पत्रकारांशी संवाद साधण्यापासून रोखतााना दिसल्यावर यावर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – Uddhav Thackeray : विनोद तावडे तावडीत सापडले असतील तर…; ठाकरेंचा भाजपावर निशाणा
विवांत हॉटेलबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने रोखल्याप्रकरणी भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले की, विनोद तावडेंकडे पत्रकार परिषद काहीच बोलण्यासारखे नव्हते. पैसे वाटप आणि आचारसंहिता काळात बैठका करायच्या असतात का? तसेच पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने यासाठी थांबवली कारण, भाजपाला माहित होते की, हे सर्व आपल्या अंगाशी येईल. घडलेल्या घटनेप्रकरणी त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नव्हते, आचारसंहितेमध्ये पत्रकार परिषद घेऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. पण आचारसंहितेत पत्रकार परिषद घ्यायची नाही, असे कुठे लिहिले आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जोपर्यंत कारवाई करत नाही, तोपर्यंत विनोद तावडेंना सोडणार नाही, अशी भूमिका तुम्ही घेतली होती. पण आता विनोद तावडे जात आहेत, असा प्रश्न विचारला हितेंद्र ठाकूर म्हणाले की, त्यांनी मला 50 फोन केले, म्हणून त्यांना म्हटले की, जा आता तुम्ही जे आहे, ते संपवा. आपण मित्र आहोत, म्हणून सोडून दिलं त्यांना, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले. तसेच निवडणूक आयोग आणि पोलिसांवर प्रशासनाचा दबाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा – Sanjay Raut : भाजपाकडे नैतिकता असेल तर तावडेंवर कारवाई करतील, पैसे वाटल्याप्रकरणी राऊतांची टीका