विरार : विरार पूर्वेकडील साईबाबा मंदिर वीर सावरकर मार्ग या रस्त्याच्या मधील गटारे ओव्हरफ्लो होऊन दूषित पाणी रस्त्यावर साचू लागले आहे. यामुळे वाहतूक कोंडी सोबतच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या पसरत चाललेल्या एचएमपीव्ही आजाराला जणू पालिका आमंत्रण देते का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. चीनमध्ये एचएमपीव्ही या संसर्ग आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. भारतात देखील त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. वसई -विरार शहर पालिकेने या आजारावर गांभीर्याने लक्ष देत नागरिकांना उपायोजना सुचवल्या आहेत. मात्र पालिकेच्या घनकचरा विभागाच्या दुर्लक्षाअभावी शहरातील गटारे मागील अनेक दिवसांपासून रस्त्यावरून वाहू लागली आहेत. यामुळे एचएमपीव्ही या आजाराला पालिकाच आमंत्रण देते आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दूषित पाणी साचल्यामुळे दुर्गंधीजन्य वास येऊ लागला आहे . यामुळे तेथील वातावरण दूषित झाले आहे. अशा परिस्थितीत डेंग्यू, मलेरिया अशा घातक आजारांचा शिरकाव वाढू शकतो. तसेच पालिका प्रशासनाने यावर तोडगा काढून पुन्हा एकदा नाले साफसफाई करून घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरात मागील दोन महिन्यांपासून वाढत्या मच्छरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे नागरिक देखील हैराण झाले आहेत. अशाच पद्धतीने दूषित गटाराचे पाणी जर रस्त्यावर आले, तर मच्छरांचे प्रमाण वाढेल आणि साथीच्या आजारांनी नागरिक ग्रस्त होतील. गटाराचे पाणी साचलेल्या रस्त्यावरून शेकडो गाड्या प्रति मिनिटाला ये-जा करत असतात. यामुळे वाहनाच्या टायरमधून उडणारे पाणी बाजूने चालत जाणार्या नागरीकांच्या अंगावर उडले जाते. यामुळे वाहन- चालक आणि नागरिक असा वाद वाढू लागला आहे.
आजच या कामाची पाहणी करून ते काम लवकरात लवकर करायला सांगतो.
– नानासाहेब कामटे – उपायुक्त, घनकचरा विभाग