विरार : जगभरात थैमान घातलेल्या एचएमपीव्ही नव्या व्हायरसमुळे सर्वत्र ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच अनुषंगाने वसई- विरार शहर महानगर पालिकेने आता आरोग्याच्या दृष्टीने सतर्कतेची भूमिका घेतली आहे. हा व्हायरस नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक नसला तरी पालिकेकडून नव्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगर पालिकेने वसईच्या फादरवाडी या परिसरात आयसोलेशन इमारत तयार ठेवली आहे. तर सर्दी खोकला होणार्या रुग्णांवर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांचे खास लक्ष असणार आहे.
चीनमधून आलेल्या नवीन विषाणू मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक सामान्य रोग आहे जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातीला उद्भवतो. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडसमध्ये २००१ मध्ये आढळला होता. मात्र या विषाणूची लक्षणे आढळली, तर त्वरित निदान आणि उपचार हे रुग्णांना मिळावेत, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने दक्षता घेतली आहे.
वसई- विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने योग्य खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. ताप, थंडी, सर्दी, खोकला असलेल्या व्यक्तींवर उपचार केले जाणार आहेत. तसेच त्यांच्या नावाची नोंदणी केली जाणार आहे. यामुळे त्यांच्यावर पालिकेचे नियंत्रण राहील आणि तसेच लक्षणे आढळल्यास त्या रुग्णाला रुग्णालयात ऍडमिट करून पुढील उपचार केले जातील. असे वैद्यकीय विभाग उपायुक्त समीर बूमकर यांनी बोलताना सांगितले.
” काय करावे :
जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रूमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारीत सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा.
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्यावी.
” काय करू नये
हस्तांदोलन करू नये.
टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नये.
आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा.
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करु नये.
सार्वजनिक ठिकाणी थंकू नये.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेऊ नये.