Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर पालघर सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात महामार्ग प्राधिकरण नामानिराळे

सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात महामार्ग प्राधिकरण नामानिराळे

Subscribe

मात्र, फक्त वाहन चालक महिलेवर गुन्हा दाखल झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठीशी घालण्याचे सुरू आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

डहाणू :  मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात होऊन त्यांचा व त्यांच्या एका सहकार्‍याचा अपघाती मृत्यू झाला होता. ह्या प्रकरणी अपघाताची घटना दाखल होऊन चौकशी अंती घटनेच्या 2 महिन्यांनंतर 5 नोव्हेंबर 2022 रोजी वाहन चालक महिला अनाहीता पंडोल यांच्यावर वेगात आणि हयगायीने वाहन चालवून अपघात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु,जाणकारांच्या मते सदरचा अपघातास महामार्ग प्राधिकरण देखील तितकेच जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर सुध्दा गुन्हा दाखल होण्याचे अपेक्षित होते. मात्र, चालक महिलेवरच गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सायरस मिस्त्री यांचा अपघात रस्त्यांच्या तांत्रिक त्रुटीमुळे झाल्याची शक्यता सुरुवातीलाच सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात येत होती. त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांवर गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, फक्त वाहन चालक महिलेवर गुन्हा दाखल झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठीशी घालण्याचे सुरू आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

मध्यंतरी तलासरी- आमगाव येथे दोन अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आमगाव येथील पुलावर पडलेले जीवघेणे खड्डे हे अपघाताचे कारण असल्यामुळे वाहन चालकासह खड्ड्यांसाठी जबाबदार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदारांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या प्रकरणात फक्त वाहन चालकावर गुन्हा दाखल केल्यामुळे जाणकारांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मिस्त्री यांच्या कारचा अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी महामार्गाची व्याप्ती तीन वहिनी वरून दोन वहिनी इतकी संकुचित होते. तर त्याठिकाणी रस्ता तीन वरून दोन वहिनीचा होत असल्याचे संकेत चिन्ह किंवा दिशादर्शक फलक देखील लावण्यात आले नव्हते आणि त्यामुळेच चालक अनाहीता पांडोल यांना रस्त्याचा अंदाज न येऊन अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, दाखल झालेला गुन्हा पाहता यंत्रणेने एकतर्फी भूमिका घेत वाहन चालकालाच दोषी ठरवले असल्याचे आरोप केले जात आहेत. तसेच ह्या अपघातात जितका चालकाचा दोष आहे तितकाच दोष महामार्ग प्राधिकरणाचा असून त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

सायरस मिस्त्री यांचा अपघात याठिकाणी झाला ते ठिकाण अपघात प्रवण असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याठिकाणी सूचना फलक, दिशादर्शक फलक आणि रस्ता तीन वरून दोन वहिनीचा होत असल्याचे दर्शक फलक लावण्यात आले नव्हते. मात्र, मेस्त्री यांच्या अपघातानंतर अपघातस्थळी महामार्ग प्राधिकरणाकडून अनेक उपाययोजना केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अपघातासाठी महामार्ग प्राधिकरण देखील तितकेच जबाबदार असल्याचे जाणवते आहे. अपघात प्रकरणी चालकाइतकेच महामार्ग प्राधिकरण देखील जबाबदार असून त्यांच्या ठेकेदारांवर देखील गुन्हे दाखल होणे अपेक्षित होते.
– आशिष चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते

सायरस मेस्त्री यांच्या अपघातानंतर चालक महिलेला जबाबदार धरत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, ह्यामध्ये सर्व अपघाताच्या गुन्ह्यात वापरली जाणारी पद्धताच वापरली असल्याचे चित्र आहे. खरे पाहता महामार्ग प्राधिकरणाची चूक नसेल तर अपघातापूर्वी गायब असलेली सूचना फलक, चिन्ह, इशारे वजा सूचना फलक हे अचानक कसे काय अवतरले असा प्रश्न पडतो. तीन पदरी रस्त्याचे अचानक दोन पदरी रस्त्यात रूपांतर होणे देखील खटकते आहे. त्यामुळेच महामार्ग प्राधिकरण ठेकेदारांवर देखील गुन्हे दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्यामुळे कुठे तरी महामार्ग प्राधिकरणाची पाठराखण केली जात असल्याचा संशय मनात आहे.
– हरबंस सिंह नन्नाडे, प्रवक्ते, ऑल इंडिया वाहन चालक मालक संघटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -