Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर पालघर खोडाळात अनेक गावांतील शेकडो मजूर बेरोजगार

खोडाळात अनेक गावांतील शेकडो मजूर बेरोजगार

प्रत्येक हाताला आणि मागेल त्याला काम हे रोजगार हमी योजनेचे ब्रीदवाक्य आहे. परंतू अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे खोडाळा मंडळात कामांची बोंबाबोंब आहे. तब्बल अनेक गावातील शेकडो मजुरांना रोजगाराला मुकावे लागले असून ऐन कोरोनामध्ये गावशीव सोडून देशोधडी व्हावे लागले आहे.

Related Story

- Advertisement -

प्रत्येक हाताला आणि मागेल त्याला काम हे रोजगार हमी योजनेचे ब्रीदवाक्य आहे. परंतू अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे खोडाळा मंडळात कामांची बोंबाबोंब आहे. तब्बल अनेक गावातील शेकडो मजुरांना रोजगाराला मुकावे लागले असून ऐन कोरोनामध्ये गावशीव सोडून देशोधडी व्हावे लागले आहे. अनेक महसुली गावामधून शेतकर्‍यांची अनेक विकासकामे खोळंबली आहेत. त्याशिवाय बहुतेक गावात नरेगाची कामेच सुरुच झालेली नाहीत. त्यामुळे शेकडो मजुरांना हातावर हात धरुन बसायची वेळ आली असून बर्‍याचशा मजुरांना बेघर व्हावे लागले आहे. मौजे शिरसगाव येथील नोव्हेंबरमधील १ व डिसेंबरमधील १ अशा २ कामांचा अपवाद वगळता मौजे केवनाळा, सुर्यमाळ, आमले, जोगलवाडी, खोडाळा, काष्टी, कोशीमशेत, धामणशेत, सावर्डे आणि कुर्लोद येथे चालू वित्तीय वर्षात एकही नरेगाचे काम देण्यात आलेले नाही. त्यामुळे नरेगापासून वंचित राहिलेल्या मजुरांकडून आत्ता बेकार भत्याची मागणी केली जात आहे. त्यात आम्ले येथील मजुरांनी तर थेट संबंधीत विभागाकडे पत्रव्यवहार करुन काम द्या, नाही तर भत्ता द्या अशी मागणी केली आहे. मात्र संबंधीत विभाग त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीच्या पुर्नमशागतीचे कामे घेवून येणार्‍या शेतकर्‍यांना मशागतीपासून दीर्घकाळ वंचित रहावे लागत आहे. यात २०१९-२० व २०२०-२१ साली अतिवृष्टीमुळे असंख्य शेतकर्‍यांच्या शेतीचे आणि बांधांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा शेतकर्‍यांचा मोठा भरणा असून हे शेतकरी याठिकाणी वारंवार हेलपाटे मारीत असतात. परंतू जबाबदार अधिकारीच भेटत नसल्याने त्यांची मशागतीची कामे तब्बल २ वर्षांपासून प्रलंबित आहेत.

- Advertisement -

मी माझ्या शेतीच्या बांधाच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षापासून कृषी कार्यालयाचे हेलपाटे मारत आहे. परंतु संबंधित अधिकारी, कर्मचारी कार्यालयात भेटतच नाही. त्यामुळे मला शेतांची दुरूस्ती रखडली आहे.
– किसन हमरे, शेतकरी खोडाळा

मोखाडा तालुक्यातील खोडाळा मंडळ कृषी अधिकारी परिक्षेत्रात दस्तूरखुद्द मंडळ अधिकारी यांचे सह दोन्हीही पर्यवेक्षकांचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे खोडाळा मंडळ परिक्षेत्रात कास्तकार व मजूरांमधून आत्ता ’अधिकारी दाखवा, हजार रुपये मिळवा’, असे आवाहन केले जात आहे.खोडाळा येथे मंडळ कृषी अधिकारी कार्यालय आहे. मात्र खोडाळा येथेच नरेगाचे एकही काम झालेले नाही. त्याशिवाय दगडी बांधांच्या नावानेही शंखच आहे. याबाबत खोडाळा पर्यवेक्षक विकास बोरसे यांचेशी संपर्क साधला असता येथील कृषी सहाय्यक नवीन असल्याने व येथे रोजगार सेवक नसल्याने त्याबाबत अडचण येत असल्याचे कारण सांगून बोरसे यांनी जबाबदारी झटकली आहे. तसेच मी नाशिक येथून मंडळ कार्यालयात येत असल्याचे बोरसे यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

कोरोना संक्रमण काळात सर्व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मुख्यालयाचे नियम धाब्यावर बसवून हे अधिकारी व कर्मचारी सर्रासपणे कोरोनाच्या प्रभावित क्षेत्रामधून दररोज येवून-जावून सेवा बजावत असल्याची कबूली देत आहेत. अशा बेदरकारपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका संभवत आहे. परंतू त्यावर कोणाचाही अंकुश नसल्याने आजही बिनदिक्कतपणे अपडाऊन सुरुच आहे.

हेही वाचा –

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

- Advertisement -