घरपालघरजात पंचायत प्रथा बंद न झाल्यास कडक कारवाई

जात पंचायत प्रथा बंद न झाल्यास कडक कारवाई

Subscribe

तो कायद्याने न सोडवता प्रबोधन करून सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी वसईचे तहसिलदार अविनाश कोष्टी, सहाय्यक पोलीस आयुक्त मोकाशी यांनी स्थानिक नेत्यांसह चिखलडोंगरे गावात सभा घेतली.

वसईः जात पंचायत प्रथा तात्काळ बंद करा. अन्यथा आणखी गावकर्‍यांवर गुन्हे दाखल होतील, असा इशारा देत वसईचे तहसिलदार डॉ. अविनाश कोष्टी यांनी चिखल डोंगरे गावातील सभेत गावकर्‍यांना दिला. भारतीय कायदा आणि संविधानाचे पालन करण्याचेही आवाहनही त्यांनी गावकर्‍यांना केले आहे. यावेळी जात पंचायतीच्या लोकांनी तहसिलदारांनी आयोजित केलेल्या सभेत जाहिर माफी मागितली. विरारजवळील चिखल डोंगरी गावातील मांगेला समाजातील काही कुटुंबियांना बहिष्कृत करून त्यांना वाळीत टाकण्यात आले होते. तसेच त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला होता. याप्रकरणी पिडीत कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर अर्नाळा पोलीस ठाण्यात सतरा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जात पंचायत हा सामाजिक प्रश्न असल्याने तो कायद्याने न सोडवता प्रबोधन करून सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी वसईचे तहसिलदार अविनाश कोष्टी, सहाय्यक पोलीस आयुक्त मोकाशी यांनी स्थानिक नेत्यांसह चिखलडोंगरे गावात सभा घेतली.

तहसिलदार अविनाश कोष्टी यांनी ही प्रथा कशी बेकायदेशी असून त्याचे दुष्परिणाम आणि यासंबंधीच्या कायद्याची माहिती गावकर्‍यांना दिली. आमच्याच समाजाच्या लोकांवर बहिष्कार टाकून दंड आकारला त्याबद्दल आम्हाला माफ करा, अशी विनंती जात पंचायतीच्यावतीने सभेत करण्यात आली. चिखलडोंगरी गावात मांगेला समाजाची वस्ती असून काही गावकरी जात पंचायत चालवत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून जात पंचायत सुरु असल्याचा दावा केला जात आहे. मुरबाड तालुक्यातील सासणे येथे असलेल्या दत्त देवस्थान वारकरी मंडळासोबत गावातील पंचायतीचा वाद सुरु आहे. त्यातून जातपंचायतीने गावकर्‍यांना सासणे येथे जाण्यास मनाई हुकुम जारी केला आहे. त्यानंतरही सासणे गुरुपिठाशी संबंध ठेवणार्‍यांना बहिष्कृत करून वाळीत टाकले गेले. त्यांच्याकडून पंचवीस हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे पिडीत कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर जात पंचायत सुरु असल्याचे उजेडात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -